नवी दिल्ली : पंजाब पोलिस ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याला अद्यापही अटक करू शकलेले नाहीत. १५८ विदेशी खात्यांतून पैसे पाठवले जात होते. यापैकी २८ खात्यांमधून पाच कोटींहून अधिक रक्कम पाठवण्यात आली होती. ही खाती पंजाबच्या माझा व मालवा भागांशी संबंधित आहेत, अशी माहिती पोलिस व गुप्तचर यंत्रणांच्या तपासात समोर आली आहे. उत्तराखंडमध्येही अमृतपालसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतपाल याचा सहकारी तजिंदर सिंग ऊर्फ गोरखा बाबा याला लुधियानात अटक करण्यात आली आहे. तो अमृतपालचा खासगी रक्षक होता.
२७ रोजी शीख समुदायाची बैठक पंजाबमधील सद्य:स्थितीबाबत अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंह २७ मार्च रोजी शीख समुदायाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला अनेक विचारवंत येणार असून, पंजाबमधील बिघडलेली परिस्थिती कशी सुधारता येईल यावर चर्चा होणार आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सरकारही या बैठकीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
अमृतपालला आश्रय देणारी महिला जेरबंदचंडीगड : अमृतपाल सिंग व त्याचा साथीदार पापलप्रीत सिंग यांना आपल्या घरी आश्रय देणाऱ्या एका महिलेला हरयाणा पोलिसांनी अटक केली आहे. बलजित कौर असे या महिलेचे नाव असून, ती हरयाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहाबाद येथील रहिवासी आहे. अमृतपालसिंग कुरुक्षेत्र येथूनच पंजाबबाहेर पळून गेला असावा, असे पोलिसांना वाटते.