नवी दिल्ली - भारताच्या ॲस्ट्रोसॅट अंतराळ दुर्बीणीने ६०० पेक्षा जास्त गॅमा किरण स्फोटांचा (जीआरबी) छडा लावून मोठी कामगिरी केली आहे. प्रत्येक जीआरबी हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू किंवा न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलीनीकरणाचे प्रतीक आहे. ६००व्या गॅमा किरण स्फोटाचा छडा लावणे हे प्रक्षेपणाच्या आठ वर्षांनंतर आणि निश्चित जीवनकाळ संपल्यानंतरही ‘कॅडमियम झिंक टेल्युराइड इमेजर’च्या (सीझेडटीआय) सातत्यपूर्ण अमर्याद कामगिरीचे मोठे उदाहरण आहे, असे सीझेडटीआयचे मुख्य संशोधक दीपांकर भट्टाचार्य यांनी सांगितले.
ॲस्ट्रोसॅटद्वारे जीआरबी संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईतील पीएच.डी.चा विद्यार्थी गौरव वरातकर याने सांगितले की, लघु महाविस्फोट (मिनी बिग बँग्स) संबोधले जाणारे जीआरबी हे ब्रह्मांडातील सर्वांत ऊर्जावान स्फोट असून, ते सूर्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात उत्सर्जित करणाऱ्या ऊर्जेहून अधिक ऊर्जा केवळ काही सेकंदात उत्सर्जित करतात.
आता ‘दक्ष’च्या निर्मितीचा प्रस्तावआयआयटी-मुंबईचे सहयोगी प्राध्यापक वरुण भालेराव म्हणाले की, ॲस्ट्रोसॅटने जे प्राप्त केले आहे त्यावर आम्हाला गर्व आहे. हे यश वृद्धिंगत करण्यासाठी अनेक संस्था एकत्र आल्या असून, त्यांनी पुढील पिढीची जीआरबी अंतराळ दुर्बीण दक्षच्या निर्मितीचा प्रस्ताव ठेवला आहे. ही दुर्बीण जगभरातील अशा कोणत्याही उपग्रहांहून श्रेष्ठ असेल. दक्ष दुर्बीण एवढी संवेदनशील असेल की सीझेडटीआयने जेवढे काम आठ वर्षांत केले तेवढे काम ती एकाच वर्षांत करेल, असे ते म्हणाले.