नवी दिल्ली - गेल्या दोन वर्षांपासून देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. 2020-21 मध्ये कोरोनामुळे पहिल्यांदाच देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. लॉकडाऊन दरम्यान तब्बल 85 हजारांहून अधिक नागरिकांना एचआयव्हीचा (HIV) संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. आरटीआयच्या माध्यमातून हा खुलासा करण्यात आला आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे 85 हजारांहून अधिक लोक एचआयव्हीचे बळी ठरले.
धक्कादायक बाब म्हणजे एचआयव्हीची लागण झालेल्यांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात होती, जिथे 10,498 लोकांना एचआयव्हीची लागण झाली. आंध्र प्रदेश (9,521), कर्नाटक (8,947) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. पश्चिम बंगाल (2,757) सारख्या जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये सर्वात कमी एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, मध्य प्रदेशात 3,037, तामिळनाडूमध्ये 1,16,536, उत्तर प्रदेशमध्ये 1,10,911 आणि गुजरातमध्ये 87,440 एचआयव्ही प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) माहिती मागवली होती. 'एनएसीओ'ने याबाबत माहिती दिली असून, त्यातून ही मोठी बाब उघड झाली आहे. 'एचआयव्ही पॉझिटिव्ह नागरिकांनी चाचणीपूर्वी किंवा नंतर समुपदेशनावेळी दिलेल्या उत्तरांच्या आधारे आयसीटीसी समुपदेशकाने संसर्गग्रस्तांची संख्या आणि संसर्गाचं कारण याबाबतची माहिती जमा केली आहे असं 'एनएसीओ'ने म्हटलं आहे. देशात 2020-21 मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात असुरक्षित लैंगिक संबंधामुळे 85 हजारांहून अधिक जणांना एचआयव्हीची लागण झाली.
RTI मध्ये, NALCO ने म्हटले आहे की असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे 2011-2021 दरम्यान भारतात 17,08,777 लोकांना HIV ची लागण झाली होती. तथापि, गेल्या 10 वर्षांत एचआयव्ही बाधित लोकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 2011-12 मध्ये, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एचआयव्हीची 2.4 लाख प्रकरणे नोंदवली गेली, तर 2021 मध्ये ही संख्या 85,268 वर घसरली. आकडेवारीनुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एचआयव्ही प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. 2020 पर्यंत, देशात 81,430 मुलांसह 23 लाख 18 हजार 737 लोक एचआयव्हीने ग्रस्त आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.