नवी दिल्ली/शिमला: पंजाब विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षानं हिमाचल प्रदेशची तयारी सुरू केली आहे. मात्र आपच्या स्वप्नांना भारतीय जनता पक्षानं जोरदार झटका दिला आहे. हिमाचल प्रदेश कार्यकारणीतील सर्व प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आपचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनुप केसरी, संघटन महामंत्री सतीश ठाकूर यांच्यासोबतच महिला मोर्चानंदेखील भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. आपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा ममता ठाकूर, उपाध्यक्ष संगीता यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यातील आपच्या जवळपास संपूर्ण कार्यकारणीनं पक्षाला रामराम केल्यानंतर राज्य कार्यसमिती बरखास्त करण्यात आली. राज्यात नवीन कार्यसमिती लवकरच स्थापन करण्यात येईल, अशी माहिती आपचे नेते सतेंद्र जैन यांनी ट्विट करून दिली.
भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून आपचे संयोजक अरविंद केजरीवालांवर जोरदार टीका केली आहे. 'हिमाचलमध्ये सरकार स्थापन करून असा केजरीवालांचा विचार होता. पण आता आपला त्यांची संघटना वाचवणं अवघड जात आहे. आपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा ममता ठाकूर, उपाध्यक्षा सोनिया बिंदल आणि संगीता यांचं भाजपमध्ये स्वागत,' असं केजरीवालांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हिमाचल प्रदेश दौऱ्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रोड शो केला होता. दिल्ली, पंजाबनंतर हिमाचल प्रदेश, गुजरातमध्ये पक्ष विजयी होईल, असा दावा त्यावेळी आपकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता भाजपनं आपला जोरदार झटका दिला आहे.