नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार उडाला आहे. या आजारामुळे दररोज चार हजारांहून अधिक जणांचे मृत्यू होत आहेत. अशातच येत्या काळात कोरोनाच्या येणाऱ्या आणखी लाटांमुळे देशापुढील अडचणी वाढत जातील. त्यामुळे या संकटाचा विचार करता, पुढील ६ ते १८ महिने भारताला अधिक काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांनी दिला आहे.
एका आघाडीच्या वर्तमानपत्राला दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत डॉ. स्वामीनाथन् म्हणाल्या की, अशा लढाईत विषाणूमध्ये सतत होत असणाऱ्या बदलांवर बरेच काही अवलंबून असते. विषाणूंच्या नव्या प्रकारांवर लसीचा होत असलेला परिणाम, लसीमुळे माणसांमध्ये निर्माण होणारी प्रतिकारक्षमता किती काळ टिकणार, हे मुद्दे महत्त्वाचे असतात.
चुकीच्या औषधांचे गंभीर दुष्परिणामसध्या सुरू असलेल्या उपचार पद्धतीबाबत त्या म्हणाल्या की, चुकीचे औषध चुकीच्या वेळी घेतले, त्याचे खूप गंभीर दुष्परिणाम लोकांना भोगावे लागतात. सामान्यपणे जी औषधे वापरली जात होती, त्यांचा आता काहीही प्रभाव दिसत नाही. उपचार करताना देश जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू शकतात.