भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यांमुळे पाकिस्तानला एक दिवस पराभव मान्य करावाच लागेल, असे हंसराज अहिर यांनी सांगितले. भारतीय सैन्य सीमेवर प्रत्युत्तर देत आहे. आपल्याला एक पाऊलही मागे हटण्याची गरज नाही. भारतीय सैन्य आपल्या संपूर्ण ताकदीने लढत आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांनी एक गोळी चालवली, तर आमच्याकडून 10 गोळ्या चालवल्या जातील. एक दिवस पाकिस्तानला पराभव मान्यच करावा लागेल, असे हंसराज अहीर यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रकार वाढले आहेत. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तान बदला घेण्याच्या उद्देशाने आणि आपली आपली कातडी वाचवण्यासाठी वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. शस्त्रसंधी उल्लंघन करताना पाकिस्तान जाणुनबुजून सीमारेषेवरील गावांना लक्ष्य केले जात आहे.
पाकिस्तानने बदला घेण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सैन्यांना भारतीय बीएसएफ जवान, लष्कर यांच्यासोबत स्थानिकांनाही टार्गेट करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी (कव्हरिंग फायर) भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये या घटना वाढल्या होत्या. यावेळीही 150 ते 200 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यासाठी भारतीय सैन्याने प्रो-अॅक्टिव्ह ऑपरेशन हाती घेतले आहे. या मोहीमेतंर्गत भारतीय सैन्याने गुरुवारी मेंढर सेक्टरमधील चौक्यांना रॉकेट आणि उखळी तोफांच्या माऱ्याने लक्ष्य केले. या हल्ल्यात पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स पूर्णपणे बेचिराख झाले होते.