ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - आसीएसई शाळांमध्ये शिकवण्यात येणा-या एका पुस्तकात मशिदीला ध्वनी प्रदूषणाचा स्त्रोत दाखवण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केल्यानंतर प्रकाशकांनी माफी मागत हे चित्र तात्काळ स्वरुपात हटवण्याचं आश्वासन दिलं. आसीएसई बोर्डाने मात्र आपण हे पुस्तक शिकवण्यासाठी कोणतीही शिफारस केली नसून, हे प्रकरण शाळांना आपल्या परिने सोडवायचं आहे असं सांगितलं.
सेलिना पब्लिशर्सने प्रकाशन केलेल्या विज्ञानाच्या पुस्तकात ध्वनी प्रदूषणाची कारणं यावर एक धडा आहे. या धड्यामध्ये ध्वनी प्रदूषणासाठी ट्रेन, कार, विमानासोबत मशिदही जबाबदार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लेखी स्वरुपात असा उल्लेख नसला तरी जे चित्र दाखवण्यात आलं आहे त्यामध्ये मशिदीचा फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोसमोर ध्वनी प्रदूषणामुळे संतप्त व्यक्ती कानावर हात ठेवून उभा असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर हा विषय आला आणि लोकांनी निषेध सुरु केला. हे पुस्तक मागे घेण्यासाठी ऑनलाइन याचिकाही सुरु करण्यात आली आहे.
प्रकाशकाने विषय वाढू लागल्यानंतर माफी मागितली आहे. प्रकाशक हेमंत गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे की, "यापुढे प्रकाशित करण्यात येणा-या आवृत्त्यांमधून हे चित्र काढण्यात येईल याची हमी देतो".
आसीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव गॅरी अराथून यांनी सांगितलं आहे की, बोर्ड अशा पुस्तकांचं प्रकाशन किंवा शिकवणी देण्याची शिफारस करत नाही. त्यांनी सांगितलं की, "जर एखादं आक्षेपार्ह माहिती असलेलं पुस्तक शाळांमध्ये शिकवलं जात असेल, तर तसं केलं जाऊ नये हे पाहण्याची जबाबदारी शाळा तसंच प्रकाशकांची आहे".
काही महिन्यांपूर्वी सोन निगमने आपल्या घराजवळील मशिदीतील अजानमुळे झोपमोड होत असल्याचं ट्विट केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.