नवी दिल्ली - रेल्वे, बसस्टॉप आणि मंदिराच्या आवारात असणारी भिकाऱ्यांची उपस्थिती ही आपल्यासाठी नित्याचीच बाब आहे. गरिबी आणि बेरोजगारीमुळे काहीजणांना भीक मागून उदरनिर्वाह करणे भाग पडते. दरम्यान, देशातील सर्वात जास्त भिकारी पश्चिम बंगालमध्ये असल्याचे समोर आले आहे. समाजकल्याण मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाल ऊत्तर देताना ही माहिती दिली आहे. समाजकल्याणमंत्री थावरचंद गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्याच्या घडीला चार लाख 13 हजार 760 भिकारी आहेत. त्यातील 2 लाख 21 हजार पुरुष तर उर्वरित महिला भिकारी आहेत. यातील सर्वाधिक भिकारी पश्चिम बंगालमध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण 81 हजार 244 भिकारी आहेत भिकाऱ्यांच्या क्रमवारीत उत्तर प्रदेश दुसऱ्या तर बिहार तिसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात 65 हजार 835 तर बिहारमध्ये 29 हजार 723 भिकारी आहेत. महाराष्ट्रामध्ये 24 हजार 207 भिकारी आहेत.भिकाऱ्यांची संख्या विचारात घेतली तर पूर्वोत्तर राज्यांमध्ये परिस्थिती चांगली आहे. येथे इतर भागांच्या तुलनेत भिकाऱ्यांची संख्या फार कमी आहे. पूर्वोत्तर भागातील अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ 114 भिकारी आहेत, तर नागालँडमध्ये 124, मिझोराममध्ये केवळ 53 भिकारी आहेत केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता दमण दीवमध्ये केवळ 22 तर लक्षद्वीपमध्ये केवळ दोन भिकारी आहेत. या यादीमध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या पर्वतीय राष्ट्रांमध्येही भिकाऱ्यांची संख्या कमी आहे. उत्तराखंडमध्ये 3320 भिकारी आहेत, तर हिमाचल प्रदेशात केवळ 809 भिकारी आहेत.
भारतातील या राज्यात आहेत सर्वाधिक भिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 5:18 PM