- मयूर पठाडे
आपण किती प्रदुषणात जगतो आणि आपण स्वत:देखील किती प्रदुषण करतो हे तुम्हाला माहीत आहे? आणि या प्रदुषणामुळे आपलं काय होतं याची तुम्हाला कल्पना आहे? जागतिक आरोग्य संघटनेनंही त्याबद्दल आपले कान टोचले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं कालच जाहीर केलेल्या अहवालात आपलं निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे, वायू प्रदुषणानं भारतात सर्वाधिक मृत्यू होतात. याशिवाय आणखी एका गोष्टीबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं खेद व्यक्त केला आहे. भारतात जे काही मृत्यू होतात, त्याच्या कारणांची नोंदच होत नाही. हे मृत्यू कोणत्या कारणामुळे झाले, कशामुळे झाले, याची कुठलीच पद्धतशीर नोंद भारतात केली जात नाही. त्यामुळे अशा मृत्यूंबाबत काही उपाययोजनाही करता येत नाही. कारणच माहीत नसेल तर त्याला पायबंद तरी कसा घालणार?
भारतात दरवर्षी साधारणपणे 92 लाख लोकांचे मृत्यू होतात. त्यातल्या दहा टक्केही मृत्यूंच्या कारणांची नोंद होत नाही. ही फारच धक्कादायक गोष्ट आहे. भारत या यादीत अगदी तळाशी म्हणजे होंडुरास, मोरोक्को, ट्युनिशिया इत्यादि देशांच्या पंक्तीत जाऊन बसतो.
भारतात कुठल्या कारणानं सर्वाधिक मृत्यू होतात?
भारतात कुठल्या कारणानं किती मृत्यू होतात, याची यादीच जागतिक आरोग्य संघटनेनं काल जाहीर केली. त्यात अर्थातच सर्वाधिक मृत्यू वायू प्रदुषणानं होत असल्याचा त्यांचा निष्कर्ष आहे.
कोणत्या कारणानं किती होतात मृत्यू?
1- वायू प्रदूषण- लाखात 133 मृत्यू
2- दुषित पाणी आणि डायरिया- लाखात 27.4 मृत्यू
3- असंसर्गजन्य आजार- लाखात 23.3
4- रस्ते अपघातातील जखमींचा मृत्यू- लाखात 16.6
5- आत्महत्या- लाखात 15.7
6- खून- लाखात चार.
खरं तर वायू प्रदुषणामुळे होणारे मृत्यू आणि त्यापासून होणारे विकार रोखणं सहज शक्य आहे. त्यासाठी इच्छाशक्ती तेवढी हवी.
वायूप्रदुषण रोखण्याचे 8 उपाय
1- जास्तीत जास्त झाडं लावा.
2- तुम्ही घरी असा, ऑफिसात किंवा बाहेर, सर्व प्रकारची एनर्जी वाचवण्याचा प्रय} करा.
3- इको फ्रेंडली प्रॉडक्ट्सचाच फक्त वापर करा.
4- धुम्रपान टाळा आणि घरात तर चुकूनही धुम्रपान करू नका.
5- झाडं तर लावावीतच, पण घरातही कुंड्यांत वगैरे रोपं लावा. काही वनस्पती घरातल्या हवेतील बेन्झिन आणि फॉर्माल्डिहाइडसारखे विषारी घटक नष्ट करण्याचं काम करतात.
6- कोणतीही नवी वस्तू निर्माण करायची तर त्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते आणि त्यातून प्रदुषणही मोठय़ा प्रमाणात होतं. त्यामुळे वस्तू रिसायकल करा आणि विकत घेतानाही अशाच प्रकारच्या वस्तू विकत घ्या.
7- अशाच कंपन्यांच्या वस्तू विकत घ्या, ज्या कमीत कमी प्रदुषण करतात आणि ज्या शाश्वत आहेत.
8- अशाच प्रकारच्या लोकप्रतिनिधींना निवडून द्या, जे प्रदुषणाबाबत गंभीर आहेत आणि त्याची व्यवस्थित काळजीही घेतात.