नवी दिल्ली : देशात नोटाबंदी लागू केल्यानंतर चलनात २००० रुपयांच्या नोटा आणल्या. त्यावेळी बनावट नोटा आणि काळा पैसा नष्ट होण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता असे होताना दिसत नाही. कारण, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे दिसून येते. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, देशात जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये सर्वाधिक संख्या २००० रुपयांच्या नोटांची आहे. त्यामुळे याबबात अनेक प्रश्न उपस्थित होतात.
इंग्रजी वृत्तपत्र 'द हिंदू'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळविलेल्या डाटामध्ये असे म्हटले आहे की, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये सर्वाधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये देशात एकूण २५.३९ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त करण्यात आले. तर २०१८ मध्ये हा आकडा केवळ १७.९५ कोटी होता. सरकारी आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या एकूण ९०५६६ बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यातील बहुतेक नोटा कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून जप्त करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटाबंदी लागू केली होती. ज्याअंतर्गत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या. ही नोटाबंदी लागून करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे देशात काळा पैसा आणि बनावट नोटा चलनातून थांबविणे, असा होता. मात्र, आता चार वर्षांनंतरही पुन्हा बनावट नोटा चलनात आल्याचे दिसून येत आहे.
याचबरोबर, २०१९-२० च्या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नाहीत, असे यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशातही २००० च्या नोटा आता कमी प्रमाणात आहेत, असे असतानाही मोठ्या संख्येने बनावट नोटा जप्त केल्या जात आहेत. २००० रुपयांच्या नोटांखेरीज मागील वर्षी ७१ हजारहून अधिक १०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. ज्यामध्ये सर्वाधिक दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील होत्या.
देशात काळा पैसा आणि बनावट चलनाविरूद्ध मोहीम राबविणार्या एनआयएने २०१९ मध्ये या प्रकरणाशी संबंधित एकूण १४ गुन्हे दाखल केले होते. यावेळी २०००च्या जवळपास १४ हजारांच्या नोटा सापडल्या होत्या. दरम्यान, बनावट नोटा रोखण्यासाठी एनआयएने एक विशेष युनिटची स्थापना केली आहे.