लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नक्षलवाद्यांकडून मानवी हक्काचे सर्वाधिक उल्लंघन होते. त्यांच्याविरोधात बचावात्मक पवित्रा न घेता सुरक्षा दलांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यात गेल्या काहीकाळात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्रासहित अन्य नक्षलवादग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री व तेथील वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.
महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यांसाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती. त्यात शाह म्हणाले की, नक्षलग्रस्त भागांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारल्याने त्या भागांत लोकसभा निवडणुकांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सोमवारी झालेल्या या बैठकीत नक्षलवादविरोधी कारवाई व नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी उचललेली पावले याबद्दल सविस्तर चर्चा झाली.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नुकताच ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्या कारवाईनंतर झालेल्या या बैठकीत अमित शाह म्हणाले की, पूर्वी सुरक्षा दले बचावात्मक पवित्रा घेऊन कारवाई करत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. नक्षलवादी हे विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे. ते आठ कोटी जनतेला विकासापासून वंचित ठेवत आहेत. डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कृत्यांमध्ये मोदी सरकारने केलेल्या कारवाईमुळे ७२ टक्क्यांनी घट झाली. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०१०च्या तुलनेत २०२३मध्ये ८६ टक्के कमी झाले आहे. नक्षलवादी आता त्यांची अखेरची लढाई लढत आहेत.
नक्षलवाद्यांचा संपूर्ण पाडाव करण्याची ग्वाही
मार्च २०२६पर्यंत नक्षलवाद्यांचे अस्तित्व नष्ट करण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.