संयुक्त राष्ट्रसंघ : उघड्यावर शौच करणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) एका अहवालात म्हटले आहे. उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या भारतात ५९७ दशलक्ष असून हे आव्हान पेलण्यासाठी उच्चकोटीच्या राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असल्याचेही युनोने सांगितले. २०१९ पर्यंत देशाला पाणंदमुक्त करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली प्रतिज्ञा ही महात्मा गांधी यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणणारी महत्त्वाकांक्षा आहे. बापूजींनी स्वातंत्र्याहून स्वच्छता महत्त्वाची असल्याचा नारा दिला होता. जगभरातील एक अब्ज नागरिक स्वच्छतागृहाचा वापर करत नाहीत. या अब्जापैकी ८२ टक्के नागरिक म्हणजेच ८२५ दशलक्ष लोक केवळ दहा देशांतील आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितले.जागतिक स्वच्छतागृह दिनानिमित्त हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक म्हणजे ५९७ दशलक्ष आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ४७ टक्के आहे. भारतापाठोपाठ इंडोनेशिया (५४ दशलक्ष), पाकिस्तान (४१ दशलक्ष), नेपाळ (११ दशलक्ष) आणि चीन (१० दशलक्ष) असा क्रम लागतो. स्वच्छतागृहाचा वापर न करणारे इतर पाच देश आफ्रिकेतील असून त्यात नायजेरिया, इथिओपिया, सुदान, नायजर आणि मोझाम्बिक यांचा समावेश आहे. उघड्यावर शौचाचे प्रचलन थांबविण्यासाठी धार्मिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे येऊन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही युनोने केले. हे आव्हान पेलण्यासाठी उच्चकोटीच्या राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे आम्हाला ठाऊक आहे. पंतप्रधान मोदींनी पाणंदमुक्तीसाठी देशात १११ दशलक्ष स्वच्छतागृहे उभारण्याची प्रतिज्ञा केली आहे. (वृत्तसंस्था)
उघड्यावर शौच करणारे भारतात सर्वाधिक
By admin | Published: November 20, 2014 2:06 AM