देशात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगे नेहरू, इंदिराजी आणि राजीव गांधींच्या काळात झाले, अमित शाहांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 08:39 PM2023-08-09T20:39:31+5:302023-08-09T20:40:52+5:30
No Confidence motion : देशात जर कुणाच्या काळात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली झाल्या असतील तर त्या जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात झाल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात भाषण करताना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत सविस्तर माहिती लोकसभेत दिली. यावेळी अमित शाह यांनी मणिपूर आणि ईशान्य भारतामधील वांशिक दंगलींचा इतिहास मांडतानाच काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच देशात जर कुणाच्या काळात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली झाल्या असतील तर त्या जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात झाल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मणिपूरच्या मुद्द्यावर बोलू झाल्यावर अमित शाह म्हणाले की, आता मी विरोधकांनी जी काही राजकीय विधानं केली त्याबाबत बोलणार आहे. मी अध्यक्षांच्या माध्यमातून गौरव गोगोई यांना सांगू इच्छितो की, तसेच आकडेवारीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, या देशात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली ह्या जवाहरलाल नेहरू, इंजिरा गांधी आणि, राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाले आहेत, असा दावा केला. तसेच यासाठी विविध दंगलीतील आकडेवारीही सभागृहासमोर मांडली.
ते पुढे म्हणाले की, मी एवढंच सांगू इच्छितो की, दंगली ह्या प्रत्येक काळात झाल्या आहेत. मात्र आम्ही कधी दंगलींना पक्षांसोबत जोडलं नाही. आम्ही कधी दंगलींबाबतचं उत्तर देताना कुठल्या गृहमंत्र्यांना रोखलेलं नाही. आम्ही कधी पंधरा पंधरा दिवस सभागृहाला वेठीस धरलेलं नाही. आम्ही विरोधात असतानाही शांतीचं आवाहन केलं आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.
यावेळी मणिपूरमधील हिंसाचाराबाबत माहिती देताना अमित शाह म्हणाले की, मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार नाही, असा भ्रम पसरवला गेला. मात्र मी या सभागृहासमोर स्पष्ट करू इच्छितो की, सभागृहाची सुरुवात होण्यापूर्वीपासून मी चर्चा करण्यास तयार असल्याचे अध्यक्षांना पत्र लिहून सांगितलं होतं. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, मी मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधकांना चर्चा करायची नव्हती. दर माझ्या उत्तरानं समाधान झालं नसतं तर पंतप्रधानांना बोलायला सांगितलं असतं त्यांनीही विचार केला असता, असे अमित शाह म्हणाले. तुम्हाला कशा प्रकारची लोकशाही व्यवस्था हवी आहे, असा सवालही त्यांनी विचारला.