नवी दिल्ली - एक देश एक निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सुमारे २१ पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली. दरम्यान, बैठकीस उपस्थित असलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी एक देश एक निवडणूक या योजनेस पाठिंबा दिला असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच यासंदर्भात विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एक देश एक निवडणूक अंतर्गत देशातील लोकसभा आणि सर्व विधानसभांची निवडणूक एकाच वेळी घेण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने गांभीर्याने पावले उचलली आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला राहुल गांधी, मायावती ममता बॅनर्जी हे प्रमुख विरोधी पक्षांचे नेते अनुपस्थित राहिले. दरम्यान, बैठक आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ''आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी एक देश एक निवडणूक या कल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे. सीपीआय (एम) आणि सीपीआय या पक्षांनी वेगळे मत मांडले. पण या कल्पनेला विरोध दर्शवला नाही. पण या कल्पनेच्या अंमलबजणावणीबाबत प्रश्न उपस्थित केले.'' दरम्यान, एक देश एक निवडणूक या कल्पनेबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.