नवी दिल्ली - भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊन आठ वर्षे पूर्ण होत आल्यानंतरही नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या भारतातील १०० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांनी अव्वलस्थान पटकावले आहे. तर या यादीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाहा हे दुसऱ्या स्थानावर आहेत. नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी सहावे स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत सोळावे आणि शरद पवार यांनी १७ वे स्थान पटकावले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना ८३ वे स्थान मिळाले आहे.
इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या या यादीनुसार पंतप्रधान मोदी अव्वलस्थानी आहेत. कोरोनाचे संकट, कोरोनावरील लसीचे व्यवस्थापन, विधानसभा निवडणुकीतील भाजपाची दमदार कामगिरी यामुळे मोदींची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. या यादीवर नजर टाकल्यास अमित शाहा यांना दुसरे स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तिसऱ्या स्थानावार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना चौथे स्थान मिळाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे पाचव्या स्थानावर आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहाव्या स्थानावर आहेत. उद्योगपती गौतम अदानी हे सातव्या स्थानी आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आठव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवव्या आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन दहाव्या स्थानावर आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचा विचार केल्यास यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १६ वे स्थान मिळाले आहे. तर शरद पवारांना १७ वे स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तिसऱ्या स्थानी आहेत. गेल्या काही काळात आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना ८३ वे स्थान देण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेच फडणवीसांचे स्थान २१ अंकांनी घसरले आहे. गतवर्षी ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत ६२ व्या स्थानी होते.
पहिल्या १० स्थानांनंतरच्या प्रमुख व्यक्तींचा विचार केल्यास त्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या अकराव्या स्थानी आहेत. तर सरन्यायाधीश रमण्णा हे १२ व्या स्थानी आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तेरावे स्थान मिळाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २७ वे, राहुल गांधी यांना ५१ वे आणि अखिलेश यादव यांना ५६ वे स्थान मिळाले आहे.