यूपीए सरकारच्याच काळात सर्वाधिक प्रगती- पी. चिदंबरम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:08 AM2018-08-20T00:08:36+5:302018-08-20T00:09:17+5:30
स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वात जास्त प्रगती काँग्रेसप्रणित केंद्रातील यूपीए-१, यूपीए-२ या सरकारांच्या दशकभराच्या कालावधीत झाली आहे, असा दावा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. सध्या देशात वास्तवातील, कायद्याने नेमलेला व एक अदृश्य असे तीन अर्थमंत्री देशाची अर्थव्यवस्था हाताळत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
यूपीए-१च्या काळात देशाचा सरासरी विकासदर ८.८७ टक्के होता. २००७-०८या कालावधीत तो दोन अंकी म्हणजे १०.०८ टक्के झाला होता. यूपीए-२च्या काळात देशाचा सरासरी विकासदर ७.३९ टक्के होता. यूपीए १ व २ सरकारांच्या काळात देशातील १४ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश आले असेही चिदंबरम म्हणाले. केंद्राच्या सांख्यिकी विभागाने देशातील राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाबाबत जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्याचा आधार त्यांनी आपल्या वक्तव्यासाठी घेतला. हा अहवाल केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खात्याने शुक्रवारी वेबसाइटवर झळकवला होता.
भाजपाचा टोला
भाजप प्रवक्ते समबित पात्रा यांनी म्हटले की, ही आकडेवारी अधिकृत नसून तिचा सरकारने अद्याप स्वीकार केलेला नाही. ज्यावेळेला काँग्रेसला यश मिळत नाही ते अपयश साजरे करताना दिसतात. यूपीए सरकारच्या काळात महागाई वाढली होती. आर्थिक तूट कमी करण्यात त्यांना अपयश आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत जगातील पहिल्या सहा मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाला.