चंदीगड, दि. 19 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला 25 ऑगस्टला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. यानंतर पंचकुला, सिरसा व हरयाणाच्या अन्य भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी हरयाणा पोलिसांनी 43 जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये राम रहीमची मानस मुलगी हनीप्रीत सिंग आणि डेसा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्सा यांची नावे टॉपला आहेत. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी 25 ऑगस्टला हिंसाचार माजवला. या हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. तसेच, यामध्ये पोलिसही जखमी झाले. दरम्यान, या हिंचारानंतर हनीप्रीत सिंग फरार आहे. हनीप्रीत हिच्यासह डेरा सच्चा सौदाच्या इतर फरार अनुयायांना शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.राम रहीम याला शिक्षेनंतर न्यायालयातून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप हनीप्रीत सिंग आणि आदित्य इन्सा यांच्यावर आहे. याचबरोबर, याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा कार्यकर्ता प्रदीप गोयल इन्सा आणि प्रवक्ता आदित्य इन्साचा नातेवाईक प्रकाश यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.हिंसाचारप्रकरणी 43 जणांची जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. हरयाणा पोलिसांच्या संकेतस्थळावर हि लिस्ट त्यांच्या फोटोंसह अपलोड करण्यात आली आहे. तसेच, या मोस्ट वाँटेड लिस्टमधील व्यक्तीची माहिती जो कोणी पोलिसांनी देईल, त्यांनी नावे गुपित ठेवण्यात येतील, असे पंचकुला पोलीस आयुक्त एएस चावला यांनी सांगितले. दरम्यान, हनीप्रीत सिंगविरोधात हरयाणा पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे हनीप्रीत सिंग देश सोडून जाऊ शकत नाही. मात्र, ती सध्या फरार असून नेपाळमध्ये असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.
मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये हनीप्रीत टॉपला, नेपाळमध्ये असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 7:04 PM