नवी दिल्ली - भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदच्या मनात 'रॉ' या भारतीय गुप्तचर यंत्रणेची दहशत बसली आहे. रॉ आपल्याला संपवेल अशी भिती त्याला वाटत आहे असे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितले. भारत सरकार, भारतीय गुप्तचर यंत्रणेचा धाक सईदच्या मनात निर्माण झाला असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही असे खुर्शीद यांनी सांगितले.
परदेशी गुप्तचर यंत्रणा सईदला संपवण्याचा प्लान आखत आहेत त्यामुळे त्याच्या संरक्षणात वाढ करण्यात यावी असे पाकिस्तान सरकारमधील अधिका-यांचे मत आहे. पाकिस्तानातील एका आघाडीच्या दैनिकाने हाफिज सईदला संपवण्याचा कट आखला जात असल्याचे वृत्त दिले असून यात रॉ चा संदर्भ दिला आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गुप्त माहिती गोळा करण्याची जबाबदारी रॉ वर आहे.
काश्मीर मुद्यावरुन त्यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले. मोदी सरकार काश्मीर मुद्दा ज्या प्रकारे हाताळतेय त्यावर सलमान खुर्शीद यांनी टिका केली. पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे पण काश्मीरप्रश्न सोडवण्याच्या विषयावर मोदी सरकार दिवाळखोर आहे.भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर सरकार स्थापन केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही असे खुर्शीद म्हणाले. पाकिस्तान बरोबर चर्चा कधी होणार हे सांगणे कठिण आहे. पण चर्चेशिवाय कुठली लढाई संपल्याचेही ऐकिवात नाही असे खुर्शीद म्हणाले.