नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. विविध क्षेत्रांमध्ये आज देश नवी उंची गाठत असल्याचं मोदी म्हणाले. आज संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहतं आहे, असंही त्यांनी म्हटलं. मोदींनी त्यांच्या 82 मिनिटांच्या भाषणात गरीब हा शब्दाचा सर्वाधिक वापर केला. याशिवाय किसान आणि युवा हे शब्ददेखील अनेकदा वापरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे लाल किल्ल्यावरील पाचवं भाषण होतं. याआधीच्या चार स्वातंत्र्य दिनाच्या भाषणांतही मोदींनी गरीब, किसान या शब्दांचा सर्वाधिक वापर केला आहे. मोदींनी त्यांच्या आजच्या भाषणाची सुरुवात दलित आणि पिछडे (मागास) या शब्दांनी केली. मोदींनी त्यांच्या संपूर्ण भाषणात दलित या शब्दाचा वापर एकदा केला. तर पिछडे हा शब्द दोनदा वापरला. पंतप्रधानांनी गरीब या शब्दाचा वापर तब्बल 39 वेळा केला. तर युवा या शब्दाचा वापर नऊवेळा केला. मोदींनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांवरही भाष्य केलं. त्यांच्या भाषणात किसान हा शब्द 14 वेळा येऊन गेला. विशेष म्हणजे लाल किल्ल्यावरुन केलेल्या गेल्या चार भाषणांमध्ये मोदींनी एकदाही दलित किंवा पिछडा या शब्दांचा वापर केला नव्हता. मोदींची लाल किल्ल्यावरील भाषणं लक्षात घेतल्यास त्यांनी 2014 मध्ये गरीब आणि गाव या शब्दांचा सर्वाधिक वापर केला होता. हे दोन्ही शब्द त्यांनी प्रत्येकी 29 वेळा वापरले होते. तर युवा या शब्दाचा वापर त्यांनी 27 वेळा केला होता. 2015 च्या भाषणातही मोदींनी गरीब या शब्दाचा वापर सर्वाधिकवेळा केला. त्यांच्या भाषणात हा शब्द 44 वेळा येऊन गेला. तर किसान या शब्दाचा वापर त्यांनी 23 वेळा केला. या भाषणात भ्रष्टाचार (19), कृषी (13), रोजगार (12) आणि गाव (11) या शब्दांवरदेखील मोदींनी भर दिला होता. 2016 मध्ये मोदींच्या भाषणात किसान (31) शब्दाचा सर्वाधिक उल्लेख होता. त्याखालोखाल मोदींनी गरीब (27), बिजली (20), गाव (15), युवा आणि बल्ब (प्रत्येकी 13) या शब्दांचा वापर केला होता. तर 2017 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी मोदींनी त्यांच्या भाषणात किसान या शब्दाचा सर्वाधिक वापर केला. त्यांनी या शब्दाचा वापर 19 वेळा केला होता. याशिवाय गरीब या शब्दाचा वापर 17 वेळा केला.
39 वेळा गरीब; 22 वेळा गाव; जाणून घ्या मोदींनी भाषणात सर्वाधिक वापरलेले शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 11:29 PM