नवी दिल्ली - सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंटसाठी लोकं क्रेझी झाल्याचं अनेकदा आपण पाहिलं आहे. सोशल मीडियावरुन आपली ओळख निर्माण व्हावी, यासाठी अनेक सेलिब्रिटी, मॉडेल किंवा अभिनेत्री हॉट फोटो शेअर करतात. हॉट व्हिडिओही अनेकदा बनवून ते शेअर केले जातात. मात्र, आता एका महिलेनं चक्क आपल्या अल्पवयीन मुलासोबतच हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरुन, दिल्लीमहिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या महिलेला नोटीस जारी केली आहे.
महिलेने केवळ सोशल मीडियावर लाईक्स मिळावे, चर्चा व्हावी यासाठी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासली आहे. आपले फॉर्लवर्स वाढविण्यासाठी या महिलेनं केलेला तमाशा नेटीझन्सला अजिबात आवडला नाही. अनेकांनी या महिलेला ट्रोल केलंय. तर, महिला आयोगाने या महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संबंधित महिला आणि त्यांच्या मुलाचे 4 फोटो ब्लर करुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या महिलेला इन्स्टाग्रामवर 1.60 लाख फॉलोवर्स आहेत. या महिलेने काही दिवसांपूर्वी आपल्या मुलासोबत अश्लील गाण्यावर डान्स केलाचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, टीका झाल्यानंतर तो व्हिडिओ डिलिट केला आहे. स्वाती माहिवाल यांनी या महिलेची ओळख सांगितली नाही. पण, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे सांगितले आहे.
आयोगाच्या अध्यक्षांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, लहान मुलाला महिलेकडून चुकीची शिकवण देण्यात येत आहे. आत्ताच ही महिला आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासत आहे, जेव्हा हा मुलगा मोठा होईल, तेव्हा तो आपल्या आईकडे कुठल्या नजरेतून पाहिल, असा प्रश्न तक्रारीत विचारण्यात आला आहे. तसेच, हा प्रकार असाच घडत राहिला, तर भविष्यात मुलाची मानसिकता गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे जाईल. त्यामुळे, पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करुन, मुलाचे समुपदेशन करावे, असे मालीवाल यांनी म्हटले आहे.
आयोग महिलाविरोधी नाही
महिला आयोग सोशल मीडियाविरुद्ध किंवा महिलाविरोधी नाही. महिलांच्या संरक्षणासाठीच हा आयोग आहे. सोशल मीडियातून अनेक महिला आपली कला सादर करतात. मात्र, ज्या महिलांकडून असे सामाजिक वातावरण कलुषित करणारे कृत्य घडत असेल, त्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे, असे माहिवाल यांनी म्हटलं आहे. तसेच, सोशल मीडियावरील ते व्हिडिओ तात्काळ हटविण्याचेही त्यांनी सांगितले आहे.