सान जोस : अमेरिकेतील फेसबुकच्या कार्यालयात चर्चेदरम्यान आईचा विषय निघताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डोळे पाणावले. गरीब कुटुंबातून असल्याने त्यांचे पालनपोषण करण्यासाठी आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी घासण्यासह अनेक कष्ट घेतल्याचे सांगत ते भावविवश झाले. ‘टाऊन हॉल’ कार्यक्रमात ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या यशात असलेल्या आईच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारला होता. आईविषयी बोलताना मोदी म्हणाले, मी लहान होतो, आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माझी आई शेजारच्या घरी भांडी घासायची, पाणी भरायची, मजुरीही करायची. मोदी यांनी बालपण आणि आईबाबत आठवणी सांगताच गजबजलेल्या सभागृहातील सर्वजण भावनिक झाले आणि सर्वांनी उभे होऊन टाळ्या वाजवीत मोदींच्या भावनेशी स्वत:च्या भावना जोडल्या. विशेष म्हणजे यावेळी मार्कचे आई-वडिलही उपस्थित होते. मोदी म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात आई आणि शिक्षक या दोघांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. माझ्या जीवनात आई-वडिलांचे मोठे योगदान आहे. मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहे. मी रेल्वेस्थानकावर चहा विकत असल्याची माहिती सर्वांना आहे. कुणीही कल्पना करू शकणार नाही की, एका मोठ्या लोकशाही देशाने चहा विकणाऱ्याला आपला नेता मानले. त्यासाठी मी देशाच्या १२५ कोटी जनतेला नमन करतो की, त्यांनी माझ्यासारख्या व्यक्तीचा स्वीकार केला. बालपणीच्या आठवणीत रमलेल्या मोदींनी सांगितले की, वडील आता हयात नाहीत, आई ९० वर्षांची असूनही स्वत:चे काम स्वत: करते. तिचे शिक्षण झाले नाही, मात्र टीव्हीच्या बातम्या बघून जगाच्या घडामोडींवर तिचे लक्ष असते. हे केवळ माझ्यासंदर्भातच नाही, तर भारतातील लाखो माता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपले जीवन समर्पित करतात. अशा मातांना वंदन करीत, त्यांची प्रेरणा व आशीर्वाद आम्हाला चांगल्या मार्गाने जाण्यासाठी शक्ती देतील. महिला सशक्तीकरणावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मोदी म्हणाले की, जगात सर्वत्र देवाची कल्पना आहे आणि सर्व धर्मात पुरुषच देव आहे. मात्र केवळ भारतातच स्त्रीला देवतेचे स्थान आहे. भारताचे आर्थिक विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी देशातील महिलांचे योगदान आवश्यक आहे, म्हणून लोकसंख्येत ५० टक्के वाटा असलेल्या महिलांना घरात बंदिस्त करून ठेवल्यास हे लक्ष्य गाठता येणार नाही. त्यासाठी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. महिलांची भागीदारी वाढविण्यासाठी पोलीस विभागात महिलांच्या ३० टक्के आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ५० टक्के महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. आता महिलांनी निर्णय प्रक्रियेतही अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आईच्या आठवणींनी भावविवश झाले मोदी!
By admin | Published: September 28, 2015 2:53 AM