रांची - झारखंडमधील चतरा जिल्ह्यामध्ये डॉक्टरांकडून झालेल्या चुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे नसबंदी केल्यानंतर आठ महिन्यांनी एक महिला माता बनली आहे. ही घटना घडल्यानंतर सिव्हिल सर्जन डॉक्टरांनी ही चुक कुणाकडून घडली याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. डॉक्टरांकडून झालेल्या या चुकीमुळे कुटुंब नियोजनाच्या अभियानालाही धक्का बसला आहे. त्याबरोबरच सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (The mother became a woman eight months after the Family Planning Operation)
मिळालेल्या माहितीनुसार नसबंदी केल्यानंतर महिला माता बनल्याची ही घटना चतर जिल्ह्यातील मयूरहंडजवळील तिलरा गावात घडली आहे. तिलरा गावातील राजू पासवान यांची पत्नी कांचन देवी हिने २५ जानेवारी रोजी इटखोरीच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात नसबंदी करून घेतली होती.
सार्वजनिक आयोग्य केंद्रातील डॉक्टर भूषण राणा यांनी कंचन देवी यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. मात्र त्यानंतरही ती गर्भवती राहिली. हजारीबागच्या एका खासगी रुग्णालयात तिने एका मुलाला जन्म दिला. प्रभारी वैद्यकीय अधिकारी सुमित जायसवाल यांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
चतरा येथील वैद्यकीय अधिकारी एसएन सिंग यांना जेव्हा या प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सांगितले की, नेमकी कुणाकडून चूक झाली आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. हलगर्जीपणा कुठल्याही पातळीवरून झालेला असो, नसबंदीनंतर माता बनणे हे डॉक्टरांकडून मोठी चूक झाल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे आहे. त्याशिवाय कुटुंब नियोजन अभियानालाही हा मोठा धक्का आहे. सरकारी पातळीवर कुटुंब नियोजनासाठी नसबंदीला खूप प्रोत्साहन दिले जाते. मात्र अशा घटनांमुळे त्याला धक्का लागतो.