उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमिनीच्या वाटणीवरून वाद झाला होता. आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवला गेला आणि मुली भांडत राहिल्या. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मार्ग निघेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. जवळपास 8 ते 9 तास वाया गेले. या घटनेवरून लोक महिलेच्या मुलींवर टीका करत आहेत.
मथुरेतील मसानी येथील स्मशानभूमीतून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे 85 वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर तिच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरून भांडण सुरू झाले आणि त्यामुळे अनेक तास महिलेवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले लोकही परत गेले. स्मशानभूमीत अनेक तास मुलींचा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. यामुळे लोकांना खूप वेळ वाट पाहावी लागली. पुष्पा यांना मुलगा नाही. त्यांना तीन मुली आहेत. मिथिलेश, सुनीता आणि शशी अशी मुलींची नावं आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या त्यांची मोठी मुलगी मिथिलेश यांच्या घरी राहत होती. मिथिलेशने आपल्या आईला आपल्या बाजुने वळवून घेऊन त्यांचं शेत विकल्याचा आरोप आहे. यानंतर पुष्पा यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याची माहिती पुष्पा यांच्या इतर दोन मुली सुनीता आणि शशी यांना समजताच त्यांनीही स्मशानभूमी गाठली.
मोठ्या बहिणीला दोष देऊन त्यांनी आईचा अंत्यविधी थांबवला. आईच्या मालमत्तेच्या वाटणीवरून दोन्ही बहिणींचे मोठ्या बहिणीशी भांडण सुरू झाले. आईची उरलेली संपत्ती आमच्या नावावर करा, तरच ते अंत्यसंस्कार करू, अशी मागणी सुनीता आणि शशी करू लागल्या. पण मिथिलेशला हे मान्य नव्हतं. बहिणींमधला हा संघर्ष बराच काळ सुरू होता. त्यानंतर स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले पण तेही तिन्ही बहिणींना बराच वेळ समजवू शकले नाहीत. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिन्ही बहिणींमध्ये लेखी करार करण्यात आला, ज्यामध्ये महिलेची उर्वरित मालमत्ता शशी व सुनीता यांच्या नावे करण्यात येईल, असं लिहिलं होतं. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले. या संपूर्ण घटनेला सुमारे 8 ते 9 तास लागले. तोपर्यंत मृतदेह स्मशानभूमीतच ठेवण्यात आला.