गेल्या वर्षभरापासून दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नेहमी अमूल दरवाढीसाठी पुढाकार घेत असते. यानंतर अन्य कंपन्या अमूलप्रमाणे दरवाढ करतात. परंतू आता मदर डेअरीने हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता अन्य कंपन्या पुन्हा दरवाढ करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून दुधाची दरवाढ सातत्याने होते आहे. मदर डेअरीने फुल क्रीम दुधामध्ये लीटरमागे एका रुपयाची वाढ केली आहे. तसेच टोकन दुधामध्ये लीटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. नवे दर सोमवारपासून लागू होतील. ही दरवाढ दिल्ली आणि एनसीआरमध्ये करण्यात आली आहे. खर्च वाढल्याने दुधाच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.
दिवाळीच्या आधीच काही दिवस दूध उत्पादक कंपन्यांनी लीटरमागे दोन रुपयांची दरवाढ केली होती. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये दरवाढ करण्यात आली होती. मदर डेअरीने अशाप्रकारे यंदा चौथ्यांदा दुध दरात वाढ केली आहे. मदर डेअरी दिल्ली एनसीआरमध्ये सर्वात मोठा पुरवठादार आहे. दर दिवशी कंपनी या भागात ३० लाख लीटर दुधाची विक्री करते.
या दरवाढीनंतर मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत ६४ रुपये झाली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. अर्ध्या लीटरच्या पॅकची किंमत बदललेली नाही.