मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. नेहमी म्हणायचे, पोरी, तू मोठी झालीस ना मोठ्या धुमधडाक्यात तुझं लग्न लावून देईन. माझ्या लग्नाबद्दल त्यांनी मोठी स्वप्न पाहिली होती. परंतु देवाच्या मनात काही भलतचं होतं. २८ जून रोजी वडील संतोष चढार माझ्या लग्नाची आमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी नातेवाईकांच्या घरी गेले होते. संध्याकाळी मी त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले की, पोरी, रात्री १० वाजेपर्यंत मी घरी येतो पण ते आलेच नाहीत.
यानंतर पोलिसांचा फोन आला. काही अज्ञात लोकांनी तिच्या वडिलांची हत्या केली होती. वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मी आज नवरी बनलीय, परंतु पप्पासोबत नाहीत. ते असते तर खूप आनंदी असते. ही व्यथा आहे संतोष चढार यांची मुलगी आरती हिची. ४ दिवसांपूर्वी काही अज्ञातांनी संतोषची हत्या केली. शुक्रवारी आरती चढार हिचं लग्न होतं. आईवडील नसल्याने संपूर्ण गावानं आरतीची जबाबदारी घेतली. काका गणेश यांनी आरतीला धीर दिला आणि तिला आईवडिलांची कमी जाणवू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले.
कोरोनामुळे आई गेली
काका गणेश चढार यांनी सांगितले की, वधू आरतीची आई क्रांतीबाई यांचा कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू झाला. सप्टेंबर २०२० मध्ये आई गेली. त्यानंतर वडील संतोषने मुलगी आणि दोन मुलांचा सांभाळ केला. परंतु लग्नाच्या ४ दिवस आधीच काही अज्ञातांनी वडिलांची हत्या केली. आरतीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपलं. अशावेळी गावातील लोक पुढे सरसावले. त्यांनी मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेत आरतीची पाठवणी केली.
लग्नाची पत्रिका देत असताना वडिलांची हत्या
२८ जूनच्या रात्री संतोष चढार हा भाच्चा अभिषेकसोबत नातेवाईकांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी लग्नाचं आमंत्रिण देऊन ते माघारी परतत होते. यावेळी बहेरिया ब्रीजजवळ ३ अज्ञात लोकांनी संतोष यांची चाकू भोसकून हत्या केली. मुलीच्या लग्नाच्या ४ दिवस आधीच वडिलांची हत्या झाल्याने संपूर्ण घरात शोककळा पसरली.