बाळाला घेऊन प्रवास करणं हे आईसाठी मोठं जिकरीचं काम असतं. मात्र, आईला ते करावचं लागतं, कारण आपल्या तान्हुल्याला सोडून आई राहू शकत नाही अन् आईला सोडून ते बाळही गप्प बसत नाही. मग, तो प्रवास बसच असो, ट्रेनचा असो किंवा प्लेनचा असो. अशाचा एका विमान प्रवासातील आई अन् तिच्या चिमुकल्याची गोष्ट विमानातील प्रवाशांनाही भावूक करुन गेली. आई-मुलाच्या या प्रवासात एक गोड अनुभव प्रवाशांना आला. या प्रवासात एक आई आपल्या 4 महिन्याच्या मुलासह सॅन फ्रॅन्सिस्कोला विमानातून जात आहे.
सॅन फ्रॅन्सिस्कोच्या दिशेने निघालेल्या या आईने विमानातील 200 प्रवाशांना मिठाईचा बॉक्स आणि एअर प्लग वाटल्यानं प्रवाशीही आश्चर्यचकित झाले. मात्र, या भेटवस्तूसोबत असलेली एक गोड चिठ्ठी प्रवाशांना भावूक करुन गेली. या चिठ्ठीतील मजकुराने विमानातील प्रत्येक प्रवाशांतील ममता जागली. या विमानप्रवासात आपला मुलगा जुनवो जर रडायला लागला, तर सहकारी प्रवाशांना त्रास होऊ नये, म्हणून या माऊलीने ही शक्कल लढवली.
देव करोना नामक एका प्रवाशी महिलने या विनयशील मातेचे तिच्या बाळासोबतचे मिठाई वाटतानाचे विमानातील फोटो फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मात्र, या मिठाई बॉक्ससोबत दिलेली गोड चिठ्ठी प्रवाशांच्या काळजाला हात घालते. या चिठ्ठीतून चक्क तो 4 महिन्यांचा चिमुकलाच विमानातील प्रवाशांसी संवाद साधत आहे.
''हॅलो, मी जुनवो बोलतोय, आता माझे वय 4 महिने आहे. मी आज माझ्या आई अन् आजीसह अमेरिकेला आत्यांकडे जातोय. मी थोडासा उदास आहे, कारण हा माझा पहिलाच विमानप्रवास आहे. त्यामुळे या प्रवासात मी कदाचित रडू शकतो किंवा गोंधळही घालण्याची शक्यता आहे. मी शांतपणेच हा प्रवास करणार आहे. पण, याबाबत मी वचन देऊ शकत नाही, म्हणून आपण मला माफ कराल ही अपेक्षा. म्हणूनच माझ्या आईने तुमच्यासाठी एका खाऊची पिशवी आणली आहे. त्यामध्ये एक ईअर प्लग आणि कँडी आहे. जर, मी विमानात तुम्हाला त्रास दिला, रडून गोंधळ केला, तर तुम्ही त्याचा वापर करा. एन्जॉय ट्रीप...'' आपला आभारी आहे.
अशा स्वरुपातील गोड चिठ्ठी जुनवोने विमानातील सहकारी प्रवाशांसाठी लिहिली आहे. त्यामुळे ही चिठ्ठी वाचल्यानंतर कुणीही जुनवोचा कितीही त्रास सहन करेल हे नक्की. विमानातील प्रवाशांनी आईच्या या भेटवस्तूचा आदरपूर्वक स्विकार करत, मातेचं कौतुक केलं आहे. सहकारी प्रवाशांची काळजी घेणारी हा माऊली खरंच धन्य, तर किती गोड... अशा कमेंटही अनेकांनी केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.