आईचं मुलावर असलेले प्रेम या जगात कुणीही शब्दात मांडू शकत नाही. आई-मुलाचं नातं हे मुलाच्या जन्माआधी ९ महिन्यापासून जुळालेले असते. आई कधीही आपल्याला मुलापासून लांब जात नाही. अशीच एक आई-मुलाच्या प्रेमाची ह्द्रयद्रावक कहानी आहे. जी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मुलाच्या मृत्यूनंतरही तब्बल १५ वर्ष आई त्याच्यासोबत राहतेय. त्याला वेगळं करत नाही. ज्याठिकाणी मुलावर अंत्यसंस्कार झाले. त्याच स्मशानभूमीला आईनं घर बनवलं आहे.
राजस्थानच्या सीकर येथील धर्माणा मोक्षधाम येथील ही घटना आहे. जेव्हा याठिकाणी एका वृत्तपत्राची टीम पोहचली तेव्हा तिथे अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. पुरुषांच्या गर्दीत एक महिला दिसून आली. ती महिला कधी लोकांना पिण्यास पाणी देत होती तर कधी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना लाकडं गोळा करण्यास मदत करत होती. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर महिला तिथून निघून गेली. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना या महिलेबाबत विचारणा केली तेव्हा या महिलेचं नाव राज कंवर असल्याचं कळालं. ती स्मशानतच राहते असं सांगण्यात आले.
टीमनं आसपास पाहणी केली तेव्हा ६५ वर्षीय राज कंवर या एका झाडाची फुलं तोडताना दिसली. पथकानं कॅमेरा काढून तिला शूट करण्याचा प्रयत्न केल्यावर ती रागावली. त्यानंतर कॅमेरा बाजूला ठेवल्यानंतर तिने तिच्या कमरेला लावलेल्या थैलीतून काही कागदं आणि वृत्तपत्राची कात्रणं बाहेर काढली आणि ती दाखवली. माझ्या मुलाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही. जग त्याला विसरुन गेले. तोही मला विसरला. परंतु मी त्याला कसं विसरु? त्यानंतर अंत्यसंस्कार करणाऱ्या जागेकडे दाखवत ती म्हणाली, इथेच माझा मुलगा झोपलाय, माझा इंदर..
राज कंवर यांनी सांगितले की, ३ डिसेंबर २००८ रोजी २२ वर्षीय मुलगा इंद्र रस्ते अपघातात बळी पडला. सीकरच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. मी माझ्या मुलाचा अखेरचा चेहराही पाहू शकली नाही. मृतदेह शिवधाम धर्माणा येथे आणला. माझ्याशिवाय त्याचं कुणीही नव्हतं आणि मलाही त्याच्याशिवाय कुणाचा आधार नव्हता. मीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मुलावर अंत्यसंस्कार करुन त्याच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला गेले त्यानंतर इथं परतले. १२ दिवस कुणी काही बोललं नाही. त्यानंतर महिलेचे स्मशानात काय काम? असा विचारलं जाऊ लागलं.
तेव्हा माझ्या आयुष्याची पुंजी स्मशानात आहे. मी कसं सोडून जाऊ? असं मी म्हणत होते, काही वर्षांनी लोकांची बोलणी बंद झाली. स्मशानभूमीच माझ्यासाठी घर बनलं. राज कंवर सीकरच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचा भाऊ वहिणी आणि कुटुंब राजश्री सिनेमाजवळ राहते. राज कंवरचं लग्न मंडावा येथे झालं होतं. पतीचा मुंबईत मृत्यू झाल्यानंतर तिने सासर सोडलं. एकुलत्या एक मुलाला घेऊन माहेरी आली. आई गेल्यानंतर राज कंवरनेच तिच्या मुलाला सांभाळ केला. तो इलेक्ट्रिनिक दुकानात कामाला होता. दोघंही आनंदात आयुष्य जगत होते मात्र या कुटुंबावर काळाने घाला घातला. ३ डिसेंबर २००८ रोजी एका अपघातानं राज कंवरकडून तिचं सर्वकाही हिरावून घेतले.
माझ्या मुलाची हत्या झालीय, आईचा दावा
मला हॉस्पिटलमध्ये मुलाचा चेहराही पाहायला मिळाला नाही. मालकासोबत सामान घेऊन येत असताना बाईकवरुन पडल्याचं लोकं सांगतात. परंतु तो पडला नाही त्याची हत्या झालीय. शेवटचं मुलाचं तोंडदेखील मला दाखवलं नाही. पोस्टमोर्टममध्ये त्याच्या डोक्यावर साडे चार इंचाची मोठी जखम होती. डॉक्टर बोलले तो ८ तास जिवंत होता असं राज कंवर यांनी सांगितले.