हैदराबाद : अमेरिकेतील दोन मुलांनी व्हॉटस् अॅपद्वारे तलाकचे संदेश पाठविल्यानंतर सासू-सासऱ्याने सुनांना मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना हैदराबादेत घडली. सुनांच्या तक्रारीवरून सासू-सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. अब्दुल सोेहेल आणि अब्दुल अकील हे भाऊ अमेरिकेत असतात. पाच दिवसांपूर्वी त्यांनी व्हॉटस्अॅपद्वारे त्यांच्या पत्नींना तलाकचा संदेश पाठविला. हा संदेश मिळताच सासू आणि सासऱ्याने दोन्ही सुनांना घराबाहेर काढले. सुनांनी विरोध केला तेव्हा त्यांनी त्यांना मारहाण केली. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर मोघलपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोहंमद हाफीज (६०) व पत्नी अथिया यांना अटक केली. एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यामुळे अब्दुल सोहेल आणि अब्दुल अकील हे दोघे गेल्यावर्षी न्यूयॉर्कला गेले होते. अब्दुलचा हिना फातिमा यांच्याशी २०१२ मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्ये आहेत. अकीलचा २०१५ मध्ये मेहरेन नूर यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक अपत्य आहे. दोन्ही भावांनी तीनदा तलाक असे स्टेटस ठेवून त्याचा फोटो व्हॉटस् अॅपवर टाकला. आम्हाला घटस्फोट दिला जावा, असे काहीही चुकीचे वर्तन आम्ही केले नाही. त्यांना घटस्फोट घ्यायचा असेल तर तो त्यांनी कायदेशीररीत्या आणि सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला हवा. ते आम्हाला असा घटस्फोट देऊ शकत नाहीत, असे हिना फातिमा म्हणाल्या. (वृत्तसंस्था)त्यांना घरी कसे ठेवू?माझ्या मुलांनी त्यांना घटस्फोट दिला असल्यामुळे मी त्यांना घरात ठेवू शकत नाही. म्हणूनच मी त्यांना त्यांच्या मुलांसह घराबाहेर काढले, असे मुलांचे वडील मोहंमद हाफीज यांनी म्हटले.
सासू-सासऱ्याने सुनांना घराबाहेर काढले
By admin | Published: March 05, 2017 1:28 AM