राजस्थानमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. "मला 6 मुली आहेत, माझी सासू मला त्रास देते, म्हणून मी हे पाऊल उचललं आहे, माझ्या मुलीची काळजी घ्या, तुम्ही माझ्यावर एक उपकार करा, मला माफ करा" असं एका आईने म्हटलं आहे. आपल्या लेकीला सोडून गेलेल्या एका हतबल आईने लिहिलेले हे शब्द आहेत. आधीच 6 मुलींची आई असलेल्या महिलेला सातवीही मुलगी झाली. सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आपल्या मुलीला रुग्णालयाच्या परिसरात सोडलं आणि पत्र लिहून गायब झाली.
रूग्णालयाच्या परिसरात रडत असलेल्या नवजात बाळाला रस्त्याने जाणाऱ्याने पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भरतपूरमधील मथुरा गेट पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील आहे. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रामवीर नावाच्या व्यक्तीला नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आला. परिसरात कोणीच नव्हते त्यामुळे रडण्याचा आवाज कुठून येतोय असा प्रश्न त्याला पडला.
रामवीर जिथून आवाज येत होता त्या दिशेने गेला तेव्हा कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक जमिनीवर पडले होते. मुलगी जोरजोरात रडत होती. तिला पाहताच रामवीरला धक्काच बसला. मुलीजवळ काही कागद पडून होते. रामवीर मुलगी आणि ते कागदपत्रे घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना भेटून संपूर्ण घटना सांगितली. डॉक्टरांनी तातडीने मुलीला वॉर्डात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले. सुदैवाने, कडक उन्हातही मुलीला काहीही झाले नाही. भटक्या प्राण्यांपासूनही मुलगी वाचली.
"मला आधीच 6 मुली आहेत, सासू मला त्रास देते"
रुग्णालय व्यवस्थापनाच्या माहितीवरून बालकल्याण समितीचे सदस्यही तेथे पोहोचले आणि त्यांनी रामवीरकडून संपूर्ण प्रकार जाणून घेतला. आता मुलाच्या आईचा शोध सुरू आहे. त्याचवेळी तीन दिवसांपूर्वी मुलीचा जन्म झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नवजात मुलीकडून सापडलेल्या कागदावर "मला 6 मुली झाल्या, माझ्या सासूबाई मला त्रास देतात, म्हणून मी हे पाऊल उचललं आहे, माझ्या मुलीची काळजी घ्या, तुम्ही माझ्यावर उपकार करा. मला माफ करा'' असं म्हटलं आहे.
तीन दिवसांचे बाळ
भरतपूर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिमांशू गोयल यांनी सांगितले की, नवजात मुलगी रुग्णालयाच्या आवारात टाकून दिलेली आढळून आली. तिचे आई तिला इथे सोडून गेल्याचे दिसते. जवळपास तीन दिवसांपूर्वी जन्मलेली ही नवजात मुलगी रुग्णालयाच्या परिसरात टाकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती ठीक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.