उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथे राहणाऱ्या चुलत बहिण- भावाचं एकमेकांवर प्रेम जडले. मात्र, नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध दर्शवल्याने दोघांनीही गावातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गायत्री उर्फ गुडिया आणि गोपाल दुबे, असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगालाची नावे आहेत. दरम्यान, सोमवारी या दोघांचा मृतदेह लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निनवार उत्तर गावापासून एक किलोमीटर दूर असलेल्या अंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले.
पोलीस तपासात असे समजले की, मयत गोपाल दुबेची मावस बहिण गायत्री दोन- तीन दिवसांपूर्वीच गावी आली होती. या घटनेमुळे त्यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. गायत्री दोन मुलांची आहे. याबाबत गायत्रीच्या सासरी आणि माहेरी कळवण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी दिली.