लखनौ - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई ड्युटीवर असताना घरी असलेल्या दोन लहान जुळ्या मुलींना सांभाळण्याची जबाबदारी वडिलांवर होती. मात्र वडिलांचा अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. पण त्या कोवळ्या निरागस मुलींना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला हे कळलेच नाही. त्या वडिलांच्या मृतदेहासोबत दिवसभर खेळत राहिल्या. संध्याकाळी आई घरी परतली. तेव्हा तिने पतीला निपचित पडलेले पाहिले. तिला अंदाज आला की पतीला हृदयविकाराचा झटका आलाय. तिने त्यांना लगबगीने रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही घटना लखीमपूर खीरीमधील काशीनगर भागात घडली आहे. सरकारी डॉक्टर असलेले दाम्पत्य येथे पाच वर्षांपासून येथील एका घरात भाड्याने राहत होते. पती डॉ. राजेश मोहन गुप्ता बाजुडीहा गावात तैनात होते. तर पत्नी डॉ. वीणा गुप्ता शहरातील सीएचसीमध्ये तैनात होत्या. डॉ. वीणा जेव्हा घरी परतल्या. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता त्यांनी आवाज दिला. दरवाजा मोठ्याने ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद येईना. तेव्हा आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर आत जे दृश्य दिसले ते धक्कादायक होते.
डॉ. वीणा गुप्ता यांनी सांगितले की, दरवाजा तोडला असता आतमध्ये पती बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. दोन्ही मुली आपल्या हातांना आणि गालाला कुंकू लावून वडिलांसोबत खेळत होत्या. त्यांनी वडिलांनाही कुंकू लावला होता. पतीची अशी अवस्था झालेली पाहून त्यांना हृदयविकाराचा धक्का आला असावा, असा अंदाज डॉ. वीणा गुप्ता यांना आला. त्यांनी पतीला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यांनी लोकांना विनवणी केली. तेवढ्यात पोलीसही घटनास्थळी आले.
बेशुद्ध पडलेल्या डॉ. राजेश मोहन गुप्ता यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तीन डॉक्टरांच्या टीमने त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम केलं. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण हे हार्ट अॅटॅक असल्याचे समोर आले.