अहमदाबाद, दि. 28- गुजरातमधील मुसळधार पावसाचा फटका राज्यातील प्रत्येक भागाला बसतो आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तेथिल जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पूर परिस्थितीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाकडूनच प्रयत्नही केले जात आहेत. पण पुराच्या पाण्यापासून बचाव करताना एका चिमुरड्यचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना तेथे घडली आहे. असलालीपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गाम्दी गावात ही घटना घडली आहे. तेथील 40 वर्षीय अनु कटारिया यांनी त्यांच्या 25 दिवसाच्या मुलाला बाहेरील पुरस्थितीपासून तसंच किटाणुंपासून वाचविण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्याची घटना घडली आहे. तब्बल 8 तास त्या चिमुकल्या मुलाला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आलं. त्यामुळे त्या बंद प्लास्टिकच्या पिशवीत गुदमरून त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. हितांशु असं मृत्यू झालेल्या त्या चिमुरड्याचं नावं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनु कटारिया यांना ताब्यात घेतलं आहे. पावसामुळे गाम्दी गावात 9 फुटांपर्यंत पाणी भरलं. भरलेल्या पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनु यांचा संपूर्ण परिवार ते राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसलं होतं.कुणीतरी येइन माझ्या मुलाला वाचवेल असं मला वाटलं होतं. सकाळी 8-9 च्या दरम्यान बचाव पथकाला येताना आम्ही पाहिलं होतं. घडलेली घटना ही माझ्यासाठी वाईट स्वप्नासारखी असल्याचं, अनु कटारिया यांनी सांगितलं आहे. अनुने मुलाला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्याचं घरातील कोणालाही माहिती नव्हतं. मध्यरात्री घरात पाणी शिरायला सुरूवात झाली होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घरात पाणी भरलं. या पाण्यामुळे आमच्या घरातील प्रत्येक गोष्टीचं नुकसान झाल्याचं, अनुचे पती महेश यांनी सांगितलं आहे. पाण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी आमचं कुटुंब बाजूच्या इमारतीमध्ये गेलं. तसंच अॅम्ब्युलन्स ने अनु आणि हितांशुला आजोळी सोडलं तसंच गावातील एका गरोदर महिलेला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. गावात इतकं पाणी येइल याचा अंदाज कोणीही लावला नव्हता.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानींनी केली पाहणीगुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी गुरूवारी अचानक अहमदाबादमधील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच बुधवारी आणि गुरूवारी झालेल्या अती पावसामुळे तेथिल बिघडलेल्या परिस्थितीबद्दलही माहिती घेतली. विजय रूपानी यांनी रेस्क्यू बोटीतून पाहणी करताना तेथील लोकांशी संवादही साधला. अहमदाबादमधील पूराच्या पाहणीनंतर तिकडची परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसंच तेथील लोकांचं त्वरीत स्थलांतर करावं, असंही रूपानी यांनी सांगितलं आहे.