कोलकाता : गरीब, रुग्ण व अनाथांच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या मदर टेरेसा यांना लवकरच संत घोषित केले जाणार आहे. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या दुसऱ्या ‘मेडिकल मिरॅकल’ला (चमत्कार) मान्यता दिली असून, यामुळे टेरेसा यांचा संत बनण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या प्रवक्त्या सुनीता कुमार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मदर तेरेसा यांना संताचा दर्जा मिळणार असून, आम्हाला याबाबत व्हॅटिकनकडून अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे. चर्चने दुसऱ्या चमत्कारालाही मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपूर्वी कोलकाता येथे पहिला ‘चमत्कार’ झाला होता. त्यानुसार मदर तेरेसा यांनी मोनिका बेसरा नामक बंगाली आदिवासी महिलेला तिच्या पोटातील ट्यूमरपासून मुक्ती मिळवून दिली होती. २००३ मध्ये एका सोहळ्यात पोप जॉन पॉल द्वितीय यांना तेरेसा यांच्या पहिल्या चमत्काराला मान्यता दिली होती. दुसरा चमत्कार ब्राझीलचा आहे. मदर तेरेसा यांच्या आधीच्या प्रार्थनांच्या परिणामस्वरूप एक व्यक्ती चमत्कारिकरीत्या ठीक झाली, असे त्यांनी सांगितले. संताच्या निधनानंतरही असे चमत्कार घडत असतात, असेही त्या म्हणाल्या.मदर तेरेसा यांनी ८७ वर्षांच्या असताना १९९७ मध्ये कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेरेसा यांनी गरिबांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. १९७९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.मदर तेरेसा यांच्या दुसऱ्या चमत्कारालाही मान्यता मिळाली हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. मदर तेरेसा म्हणजे परमेश्वराची दया आणि करुणेचे प्रतिबिंब होत्या.-अनिल जेटी क्योटो,दिल्लीचे आर्चबिशप
मदर तेरेसांना मिळणार संत पदाचा दर्जा
By admin | Published: December 19, 2015 1:44 AM