ऑनलाइन लोकमत
रोम, दि. ४ - गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवणा-या मदर तेरेसा यांना रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये संतपद बहाल करण्यात आले. रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संतपद बहाल केले.
व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स स्कवेअरमध्ये या सोहळयाला एक लाख नागरीक उपस्थित आहेत. भारताकडून केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज १२ सदस्यीय शिष्टमंडळासह उपस्थित आहेत. त्याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित आहेत.
पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांच्या दुस-या ‘मेडिकल मिरॅकल’ला (चमत्कार) मान्यता दिली होती त्यामुळे तेरेसा यांचा संत बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता.पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात २००३ मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तेरेसा यांचा पहिला चमत्कार सिद्ध झाल्याचे व्हॅटिकन चर्चने २००२ मध्ये जाहीर केले होते.
अनेक वर्षांपूर्वी कोलकाता येथे पहिला ‘चमत्कार’ झाला होता. त्यानुसार मदर तेरेसा यांनी मोनिका बेसरा नामक बंगाली आदिवासी महिलेला तिच्या पोटातील ट्यूमरपासून मुक्ती मिळवून दिली होती. २००३ मध्ये एका सोहळ्यात पोप जॉन पॉल द्वितीय यांनी तेरेसा यांच्या पहिल्या चमत्काराला मान्यता दिली होती.
दुसरा चमत्कार ब्राझीलचा आहे. मदर तेरेसा यांनी एका ब्राझिलियन व्यक्तीला बरे केल्याचे व्हॅटिकनने म्हटले आहे. तेरेसा यांच्या आधीच्या प्रार्थनांच्या परिणामस्वरूप एक व्यक्ती चमत्कारिकरीत्या ठीक झाली होती. मदर तेरेसा यांनी ८७ वर्षांच्या असताना १९९७ मध्ये कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेरेसा यांनी गरिबांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. १९७९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
आणखी वाचा
मदर तेरेसांचे कार्य
२६ ऑगस्ट १९१० साली रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात त्यांचा जन्म स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. तेरेसांचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्याची मुलगी. त्यांचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना त्या सेवाकार्यांत रस घेत असत. अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात त्यांनी प्रवेश केला. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त त्या भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाल्या. (१९२९). स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने त्यांचे नामांतर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे त्या ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी ने १९ वर्षे अध्यापन केले व प्राचार्य बनल्या. अध्यापन करीत असताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे त्यांना अनेक वेळा दर्शन होत असे. त्यामुळे त्यांच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार येत. किंबहुना हीच ईशसेवा होय, असे विचार दृढमूल झाले. एकदा दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच त्यांना मिळाला. तेव्हा शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन त्यांनी केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले.