देशभरातील अनेक भागांसोबतच मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातही या दिवसांत उष्णतेने कहर केला आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक सर्व उपाययोजना करत आहेत. कडाक्याच्या उन्हात श्योपूरमधला असाच एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक असहाय्य आई आणि तिची तीन निरागस मुले दिसत आहेत. मातेने उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी मुलांच्या पायाला प्लास्टिकची पिशवी बांधली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोची दखल घेत प्रशासनाने त्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुक्मिणी असं फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव असून तिच्यासोबत तिच्या तीन निष्पाप मुलीही दिसत आहेत. ही महिला रखरखत्या उन्हात श्योपूर शहरातील रस्त्यांवर मुलांच्या पायाला पिशवी बांधून फिरत होती. हे पाहून तेथून जाणाऱ्या इन्साफ कुरेशीने यांनी तिचा फोटो क्लिक केला. महिलेशी चर्चा केल्यावर कळले की तिचा नवरा आजारी आहे. ती कामाच्या शोधात शहरात आली आहे. तिच्याकडे पैसे नव्हते. त्यानंतर इन्साफ यांनी तिला चप्पल खरेदीसाठी पैसेही दिले.
फोटो व्हायरल झाल्यानंतर महिलेचा शोध घेतला असता तिचा पत्ता सापडला. महिलेच्या घरी तिचा पती सूरज आणि दोन मुली काजल (6 वर्षे) आणि खुशी (4 वर्षे) हे तिघे आढळून आले. रुक्मिणी आता एक वर्षाचा मुलगा मयंकसह जयपूरला म्हणजे राजस्थानला मजुरीसाठी गेल्याचे कळते. रुक्मिणीचा नवरा सूरज म्हणाला, त्याला टीबीचा आजार आहे, त्यामुळे फक्त त्याची पत्नी कामावर जाते. आमच्याकडे रेशनकार्ड नाही. फक्त आधारकार्ड आहे.
अंगणवाडीतून अन्न मिळतं. माझी पत्नी जयपूरला मजुरीसाठी गेली आहे असं देखील पतीने सांगितलं. याप्रकरणी श्योपूरचे जिल्हाधिकारी शिवम वर्मा म्हणाले, मी आता बाहेर आहे. ही बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या सुपरवायझर ममता व्यास आणि अंगणवाडी सेविका पिंकी जाटव यांना संबंधित कुटुंबाकडून माहिती गोळा करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ कुटुंबाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.