रायपूर : आधुनिक जगापासून पूर्णपणे अलिप्त छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना कठीण समयी वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध होणे तसे अवघडच. पण नव्यानेच सुरू झालेली मोटार बाईक रुग्णवाहिका मात्र त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे.राज्याच्या राजधानीपासून ४०० किलोमीटर दूर धानोरा आणि डोंगराळ भागातील ३५ गावांमध्ये जेथे पोहोचण्यास रस्तेही नाहीत ही मोटार बाईक अॅम्बुलन्स पोहोचली असून गरजूंवर मोफत औषधोपचार करण्यात येत आहे. ‘साथी’ नामक एका स्वयंसेवी संघटनेमुळे हे शक्य झाले आहे. संस्थेला या कार्यात युनिसेफचे सहकार्य लाभले आहे.साथीचे संस्थापक भूपेश तिवारी यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, आम्ही सर्वप्रथम या संपूर्ण परिसराचे सखोल अभ्यास केला. त्यानंतर आफ्रिकेतील दुर्गम भागात सुरू असलेल्या मोटारसायकल अॅम्ब्युलन्स सेवेचे आॅनलाईन व्हिडिओ बघितले. अखेर विजयवाडातील एका अभियंत्याने आमची ही कल्पना प्रत्यक्षात साकारली. तिवारी गेल्या २५ वर्षांपासून बस्तर क्षेत्रात समाजसेवा करीत आहेत. या संपूर्ण क्षेत्रात जादूटोणा, मांत्रिक आणि बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. उपचारासाठी गावकऱ्यांंना घनदाट जंगलातून मार्ग काढीत अनेक कि.मी. दूर चालत जावे लागते. त्यामुळे येथे आरोग्याची गंभीर समस्या आहे. प्रामुख्याने नवजात बालक आणि माता मृत्यूचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त महिलांची प्रसूती आरोग्य केंद्रात होऊन हा मृत्यूदर कमी करणे हे आमचे लक्ष्य असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. केवळ दीड वर्षात मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेने फार मोठा पल्ला गाठला असून २७२ लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे. (वृत्तसंस्था)
मोटार बाईक रुग्णवाहिका ठरतेय आदिवासींसाठी वरदान!
By admin | Published: February 20, 2016 2:48 AM