नवी दिल्ली : भारतात रस्ता अपघातात प्रतिवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत. मला त्यांचे प्राण वाचवायचे आहेत. लोकसभेत सुधारित मोटर व्हेइकल दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. नवा कायदा अस्तित्वात येण्यासाठी राज्यसभेत तो मंजूर होणे आवश्यक आहे. विरोधकांच्या काही विधायक सूचना असल्या तर त्या स्वीकारायला सरकार तयार आहे; मात्र कायदा तयार होण्यास विलंब करू नका, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी पत्रपरिषदेत केले.पत्रपरिषदेत गडकरी म्हणाले, रस्ता अपघातांचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण देशात मोठ्या प्रमाणात (३0 टक्के) वाहनचालकांना बोगस परवाने देण्यात आले आहेत. २ हजार रुपये देऊन कोणालाही वाहन चालवण्याचा परवाना मिळतो आहे. नव्या कायद्याने हा प्रकार बंद होईल. सहजगत्या कोणालाही परवाना मिळणार नाही. त्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागेल, त्याचे मूल्यांकन संगणकामार्फत होईल. भ्रष्टाचाराला वाव नसेल. अपघातांची स्थिती चिंताजनक स्तरावर पोहोचल्याची जाणीव काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मांना मी करून दिली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींशी बोलल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीची मागणी त्यांनी केली. बहुधा बुधवारी ही बैठक होईल अशी शक्यता आहे. विधेयकातल्या तरतुदींवर आक्षेप असतील तर चर्चेतून मार्ग काढता येईल.
लाखो लोकांचे प्राण वाचवायचेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 4:08 AM