महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. लष्करात कार्यरत असलेला धुळे जिल्ह्यातील लान्स नायक मनोज संजय माळी यांचे अपघाती निधन झाले आहे. सिक्किममध्ये कर्तव्याववर असताना शहीद झाले. शिरपुर तालुक्यातील वाघाडी गावचे रहिवासी मनोज हे २५ वर्षांचे होते.
मनोज हे २४ मार्च २०१९ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. सिक्किममध्ये त्यांची तैनाती होती. गुरुवारी म्हणजेच आज सकाळी ते उंच डोंगररांगांवर सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात होते. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भारतीय सैन्याने तातडीने मनोज यांचा शोध सुरु केला. दुपारी साडे बारा वाजता मनोज यांचा मृतदेह सर्च टीमला मिळाला. मनोज यांचे पार्थिव सिक्किमच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच मनोज यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. सिक्कीमची सीमा भारतासाठी खूप महत्वाची आहे. नेपाळ आणि चीनला या राज्याची सीमा जोडलेली आहे. तसेच या ठिकाणी डोंगररांगा आहेत. यामुळे या ठिकाणी भारतीय जवान जीव धोक्यात घालून गस्त घालत असतात. याच कामासाठी मनोज हे या डोंगररांगांत तैनात होते.
मनोज यांच्या पश्चात त्यांचे वडील संजय माळी, भाऊ चेतन आणि आई सुरेखा असा परिवार आहे. वडील शेतकरी आहेत. मनोज यांचे पार्थिव उद्या वाघाडीमध्ये आणले जाणार आहे.