नवी दिल्ली : भारताला बलशाली महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविणारे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर गुरूवारी सकाळी ११ वाजता तामिळनाडूतील त्यांच्या रामेश्वरम या मूळगावी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला असला तरी सुटी जाहीर केलेली नाही. कलाम यांच्या अंत्यविधीला सहा राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी डॉ. कलाम यांचे पार्थिव राजधानी दिल्लीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे प्रत्यक्ष जाऊन आदरांजली वाहणाऱ्या मान्यवरांखेरीज देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत करोडो भारतीयांनी त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली वाहिली. दिवसभरात विदेशांतून शोकसंवेदनांचा ओघ सुरूच होता.मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव वायुदलाच्या विशेष विमानाने गुवाहाटीहून राजधानीत आणण्यात आले तेव्हा राजशिष्टाचार बाजूला सारत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांनी विमानतळावर जाऊन अंत्यदर्शन घेतले. पालम विमानतळाच्या तांत्रिक विभागात त्यांचे पार्थिव तिरंग्यात सन्मानपूर्वक लपेटून ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व स्तरातील लोकांनी गर्दी केली होती. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली.शिलाँग येथील आयआयएममध्ये व्याख्यान देत असताना सोमवारी संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले होते. सकाळी शिलाँगहून त्यांचे पार्थिव वायुदलाच्या हेलिकॉप्टरने गुवाहाटीला हलविण्यात आले तेव्हा आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी अंत्यदर्शन घेतले.डॉ. कलाम यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या १० राजाजी मार्ग येथील निवासस्थानी दुपारी ३ वाजता त्यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या चिलखती वाहनातून आणण्यात आल्यानंतर जवानांनी मानवंदना दिली त्यावेळी मान्यवरांनी उभे राहून मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी कलाम यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांना शोक आवरता आला नाही. वातावरण शोकाकूल झाले होते. मुखर्जी, अन्सारी आणि मोदी यांनी नंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊनही अंत्यदर्शन घेतले आणि तेथे ठेवलेल्या शोकपुस्तिकेत शोकसंदेश लिहिला. मोदींनी कलाम यांच्या कुटुंबीयांशी बराच वेळ चर्चा करीत सांत्वन केले.कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार डॉ. कलाम यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांच्या जन्मगावी रामेश्वरम येथे गुरूवार ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. कलाम यांचे ९९ वर्षीय थोरले बंधू मुथू मोहम्मद मीरान मराक्कईर यांनी रामेश्वरम येथेच अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मराक्कईर यांचे दोन नातू चेन्नई आणि बेंगळुरूहून दिल्लीला आले असून त्यांनी पत्रकारांना अंत्यसंस्काराबाबत माहिती दिली.चाहत्यांची दिल्लीत गर्दी : विमानतळ ते कलाम यांचे निवासस्थान असलेल्या १२ कि.मी. मार्गावरून चिलखती वाहनातून त्यांचे पार्थिव निवासस्थानी नेण्यात आले तेव्हा लोकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. अनेकांच्या हाती शोकसंवेदना व्यक्त करणारे फलक होते. बुधवारी सकाळी ७ वाजता कलाम यांचे पार्थीव वायूदलाच्या विशेष विमानाने दिल्लीहून मुदराईला नेले जाणार असून सकाळी १० वाजता दरम्यान हेलिकॉप्टरने रामेश्वरमला नेल्यानंतर संपूर्ण दिवसभर अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. गुरुवारी सकाळी ‘नमाज-ए- जनाजा’ नंतर अंत्यविधी पार पाडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने २७ जुलै ते २ आॅगस्ट या काळात शोक पाळला जाणार असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकारची कार्यालये या काळात सुरू राहतील. देशभरातील सर्व शासकीय संस्था आणि इमारतींवर फडकला जाणारा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जाईल. या काळात सरकारी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, जम्मू-काश्मीर सरकारनेही सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) मंगळवारी आपल्या स्थापनादिनाचा कार्यक्रमही रद्द केला.
देशभर आठवणी अन शोक !
By admin | Published: July 29, 2015 3:21 AM