सालेम (तामिळनाडू) - रेल्वे प्रवासादरम्यान होणारा झुरळ, उंदीर यांचा त्रास भारतीय प्रवाशांसाठी काही नवा नाही. प्रवासादरम्यान झुरळ उंदरांनी त्रस्त केल्याचा अनुभव तुम्हीही घेतला असेलच. अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वेत प्रवास करत असताना एका प्रवाशाचा उंदराने चावा घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने थेट ग्राहक मंचाकडे दाद मागितली. ग्राहक मंचानेही या प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत रेल्वेला 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ही घटना तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्यातील असून, येथील वेंकटचलम हे गृहस्थ 8 ऑगस्ट रोजी रेल्वेने चेन्नईला जात होते. प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात असलेल्या उंदराने त्यांचा चावा घेतला. त्यांनी याची तक्रार रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर त्यांनी रेल्वेच्या ग्राहक मंचाकडे दाद मागितली. वेंकटचलम यांच्या याचिकेवर ग्राहक मंचात सुनावणी झाली. त्यासुनावणीवेळी ग्राहक मंचाने वेंकटचलम यांना 25 हजार रुपये नुकसान भरपाई आणि दोन हजार रुपये उपचार खर्च देण्याचे आदेश रेल्वेला दिले.
रेल्वेत प्रवाशाला चावला उंदीर, कोर्टाने दिले नुकसान भरपाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 8:44 AM