नवी दिल्ली, दि. 3 - काश्मीरमधील अशांतता आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संकेत मिळत आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा बंद झाली असली तरी सामाजिक क्षेत्रातील मंडळी अनौपचारिकपणे एकमेकांशी संवाद साधत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशातील प्रमुख व्यक्ती दुबईत भेटल्या होत्या त्यावेऴी दोन दिवसांच्या बैठकीमध्ये आपापल्या देशातील सरकारांना चर्चेसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त पदावरून निरोप घेणारे अब्दुल बासित यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील सुरक्षा सल्लागार एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही देशातील संवाद सुरू व्हावा यासाठी अजित डोवाल आणि नासिर खान जंजुआ हे संपर्क ठेवून असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एक भारतीय उद्योगपती दुसऱ्या स्तरावर चर्चा करत असल्याचे वृत्तही प्रसारित झाले होते. मात्र परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. पण दोन्ही देशांमधील चर्चेसाठी योग्य वातावरण तयार करण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे. तसेच पाकिस्तानही भारतासोबत लवकरात लवकर चर्चा सुरू करण्यासाठी इच्छुक आहे. नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्हीकडच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण घटले आहे. दरम्यान आज संसदेत बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा होणार नसल्याचे सांगितले होते. "दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका आणि रशिया भारतासोबत उभे आहेत. पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले पण दहशतवाद थांबवल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा अशक्य आहे,"असे स्वराज म्हणाल्या.
भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेसाठी पडद्याआडून हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:36 PM