- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीश्रीराम जन्मभूमी हा राष्ट्रीय आस्थेचा मुद्दा आहे. भारतीय समाजावर अनेक शतकांपासून त्याचा प्रभाव कायम आहे. भारतातील मुस्लिम समुदायाने अयोध्या, काशी आणि मथुरा येथील फक्त तीन मशिदी अन्यत्र हलवाव्यात, देशातील उर्वरित ४० हजार मशिदी जिथे आहेत तिथेच राहू द्याव्यात. अन्य मशिदींविषयी हिंदू समुदायाची कोणतीही तक्रार नाही. न्यायालयांच्या निकालांबाबत आजवर मी जी भाकिते केली ती सर्व खरी ठरली आहेत. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल याचीही मला खात्री आहे. वर्षअखेरीला अयोध्येत राम मंदिराची उभारणी हमखास सुरू होईल, असे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले. अयोध्येतील राम मंदिर उभारणी या विषयावर अरुंधती वशिष्ठ संशोधन संस्थेतर्फे दिल्ली विद्यापीठाच्या कलादालन सभागृहात दोन दिवसांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचा वृत्तांत सादर करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित पत्रपरिषदेत स्वामी बोलत होते. राम मंदिराची उभारणी हा भारतीय जनता पक्षाचा विषय नाही, असे स्पष्ट करीत स्वामी म्हणाले, सारा संघ परिवार एकाच भावनेच्या सूत्रात बांधलेला आहे. आमच्या प्रयत्नांना साहजिकच भाजपची पूर्ण सहानुभूती आहे. निवडणुका जवळ आल्या की, अयोध्येच्या राम मंदिराविषयी विहिंप, संघ परिवार आणि भाजपची आस्था अचानक कशी जागृत होते? याचे उत्तर देताना स्वामी म्हणाले, भारतात दरवर्षीच कोणती ना कोणती निवडणूक असते. पुढल्या वर्षी या विषयाला हात घातला असता तर उत्तर प्रदेशची निवडणूक आहेच.
अयोध्या, काशीतील मशिदी हलवाव्यात
By admin | Published: January 13, 2016 4:04 AM