कोलकाता : पोलीस आणि निमलष्करी दलाने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागात संचलन केले. २४ परगना जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे संचलन करण्यात आले. राज्य सरकारने सांगितले की, बदुरिया, स्वरूपनगर, देगंगा आणि बशीरहाट भागात परिस्थिती नियंत्रणात आहे. पण, काही भागांत गुरुवारी हिंसाचाराच्या किरकोळ घटना झाल्या होत्या, अशी माहितीही मिळत आहे. स्थानिक नागरिक आपल्या घरांमध्येच होते. तर, दुकाने, बाजारपेठा, विद्यालये बंद होती. वाहतूक व्यवस्थाही जवळपास ठप्पच होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की, कोणीही दंगलग्रस्त भागात जाऊ नये. तथापि, डावे पक्ष, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी या भागात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना या भागात जाण्यापासून रोखले. (वृत्तसंस्था) भाजपा, डावे, काँग्रेसच्या नेत्यांना रोखले पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील २४ परगना जिल्ह्यात जाणाऱ्या भाजपा, डावे आणि काँग्रेसच्या नेत्यांना शुक्रवारी रोखण्यात आले. येथे जातीय संघर्षानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. डाव्या पक्षाचे नेते सुजान चक्रबर्ती यांनी सांगितले की, या भागात गेल्याने समस्या निर्माण होऊ शकते, असे कारण देत आम्हाला त्या भागात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. दंगलग्रस्त भागातील लोकांना भेटण्यासाठी आम्ही जात होतो. पोलीस आणि तृणमूल काँग्रेसच्या विरोधात डावे पक्ष बरसात क्षेत्रात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधीर चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या एका पथकाला बारासातमध्ये रोखण्यात आले. रूपा गांगुलींना ताब्यात घेतले भाजपाच्या खासदार रूपा गांगुली यांच्या नेतृत्वात उत्तर २४ परगना जिल्ह्यात दंगलग्रस्त बदुरिया भागात जाणाऱ्या भाजपाच्या एका शिष्टमंडळाला पोलिसांनी माइकल नगरभागात अडविले. रूपा गांगुली यांच्यासह पक्षाच्या १९ नेत्यांना विमानतळाजवळून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बदुरियाकडे जाण्यासाठी हे शिष्टमंडळ अडून बसल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. फेसबुकवर एका तरुणाने सोमवारी एक आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर बदुरिया आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. पण, जमावाने त्याच्या घरावर हल्ला केला आणि वाहनांना आगी लावल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दंगलग्रस्त भागात जवानांचे संचलन
By admin | Published: July 08, 2017 1:11 AM