हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महिनाभर चाललेले २२ कॅबिनेट आणि ९ राज्यमंत्र्यांची (स्वतंत्र भार) कामगिरी तपासून घेण्याचे काम बुधवारी संपल्यानंतर मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल आणि त्याच्या विस्ताराच्या चर्चा येथे जोरात सुरू आहेत. मोदी मंत्रिमंडळ ५४ सदस्यांचे आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांशी आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले मतभेद मिटवण्याची शक्यताही मोदी शोधत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (यु) आता मंत्रिमंडळात येण्यास तयार आहे. जनता दलाचे (यु) नेते लल्लन सिंह, रामनाथ ठाकूर आणि संतोष कुशवाह यांची चर्चा आहे. उत्तर प्रदेशमधील अपना दलच्या अनुप्रिया पटेल या मंत्रिमंडळात पुन्हा येण्याच्या तयारीत आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे दोन्ही गट मात्र बाहेर ठेवले जातील.स्वतंत्र भार असलेल्या दोन मंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिली जाऊ शकते. ज्योतिरादित्य शिंदे (मध्यप्रदेश), सर्बानंद सोनोवाल (आसाम), दिलीप घोष (पश्चिम बंगाल), सुशील मोदी (बिहार), भूपेंद्र यादव (राजस्थान), वरुण गांधी (उत्तर प्रदेश), जफर इस्लाम (उत्तर प्रदेश), अजय भट्ट किंवा अनिल बलुनी (उत्तराखंड) आणि निवडणूक होणार असलेल्या राज्यांतून काही जणांना मंत्रिमंडळात आणले जाऊ शकते.
पक्षाचे दीर्घकालीन हित पाहता काही युवा चेहऱ्यांना समाविष्ट केले जाऊ शकते. किमान सहा तरुण चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो. राहुल कस्वान (राजस्थान), अश्विनी वैष्णव (ओदिशा), पूनम महाजन किंवा प्रीतम मुंडे (महाराष्ट्र) आणि परवेश वर्मा अथवा मीनाक्षी लेखी (दिल्ली) यांच्या नावांची चर्चा आहे. किमान तीन मंत्र्यांना हटविले जाऊ शकते. तर, अतिरिक्त जबाबदारी असलेल्या ९ मंत्र्यांचे विभाग काढून घेण्यात येऊ शकतात. एखाद्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलाविले जाऊ शकते काय, याबाबत काहीही संकेत नाहीत. ज्या नऊ मंत्र्यांकडे अतिरिक्त जबाबदारी आहे त्यात प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, हर्षवर्धन, नरेंद्र सिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, स्मृती इराणी आणि हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे.