नवी दिल्ली : मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनाचा ४0 दिवसांचा दुखवटा काश्मीरमध्ये संपला आहे. मात्र तिथे पीडीपी-भाजप आघाडीचे सरकार स्थापन झालेले नाही. आघाडीचे सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे सरचिटणीस राम माधव मेहबूबा मुफ्तींची भेट घेण्यासाठी पुढील श्रीनगरला जाणार असून, त्यानंतर सरकारस्थापनेचा तिढा हमखास सुटेल, अशी माहिती भाजप मुख्यालयातील सूत्रांकडून दिली.जम्मू काश्मीरमधे सरकार स्थापन करण्यापूर्वी दोन्ही पक्षांत विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आघाडीच्या अजेंड्याबाबत पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्तींनी केंद्र सरकारला काही अटी घातल्या आहेत. त्यावरील चर्चा सुरू असताना पीडीपीने पवित्रा अचानक बदलला आणि आणखी काही नव्या शर्ती राज्यातील भाजप नेत्यांना ऐकवण्यात आल्या. सत्तास्थापनेत त्यामुळे साहजिकच तिढा निर्माण झाला. मात्र केंद्र सरकार आणि केंद्रीय नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर हा तिढा सुटेल, अशी भाजपला आशा आहे. (विशेष प्रतिनिधी)भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची २ फेब्रुवारी रोजी भेट घेतली आणि सरकारस्थापनेच्या निर्णयासाठी १0 दिवसांचा वेळ मागितला. ती मुदत १२ फेब्रुवारी रोजी संपत आहे. तिढा सुटावा, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा व माजी उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांच्या नेतृत्वाखाली तेथील नेत्यांचे पथक मंगळवारी दिल्लीत धडकले. गृहमंत्री राजनाथसिंह, अरूण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती या केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्यात हे नेते व्यस्त होते. आघाडीचे सरकार स्थापन करण्यातले फायदे तोटे त्यांनी केंद्रीय नेत्यांना ऐकवल्याचे समजले.
सरकार स्थापनेच्या हालचाली वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 2:10 AM