-व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ताधारी तीन पक्षांत कटुता निर्माण झाली असताना आता राज्य सरकारमधील ५० पेक्षा जास्त बोर्ड आणि महामंडळाच्या नियुक्त्यांसाठी या पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी बैठकांचे सत्रही सुरू आहे. या तीनही पक्षांचे मंत्री असलेल्या सहा सदस्यीय समन्वय समितीने या बोर्डावरील आणि मंडळावरील संचालक आणि अध्यक्ष यांच्या नावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी रविवारी एक बैठक घेतली.
या समन्वय समितीत ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे (शिवसेना), अजित पवार, जयंत पाटील (राष्ट्रवादी), अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात (काँग्रेस) यांचा समावेश असून, आतापर्यंत त्यांनी २५ वेळा बैठक घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणत्याही क्षणी ही समिती नावांची यादी सोपवू शकते. यामुळे राज्यातील राजकीय अस्थिरता कमी होऊ शकते.
नव्या नियुक्त्यांमुळे आघाडी होईल मजबूत
सुभाष देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या नियुक्त्यांसाठी चर्चा, विचारविनिमय पूर्ण झाला आहे. यादीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना उमेदवारांची यादी सादर करणार आहोत. या तीनही पक्षांचा एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविल्याचा इतिहास आहे. आपले कोणतेही चुकीचे पाऊल राजकीय भवितव्यावर परिणाम करू शकते याची जाणीव ठेवून हे पक्ष काम करीत आहेत.
भाजप सभागृहात आणि बाहेरही आक्रमक आहे. मात्र, अद्याप ही आघाडी तोडण्यात यशस्वी झालेला नाही. बोर्ड आणि महामंडळाच्या ५० हून अधिक नियुक्त्यांमुळे ही आघाडी मजबूत होऊ शकते. ज्या नेत्यांना खासदार, आमदार म्हणून संधी मिळालेली नाही, त्यांना या माध्यमातून लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.