आपण गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे कोणती?- गेल्या चाळीस वर्षांपासून मागाठाणे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या मतदारसंघातून २००९ साली मी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मागाठाणेतील नागरिकांना जास्तीतजास्त मूलभूत सुविधा देण्यावर भर दिला. बाळगोपाळ आणि ज्येष्ठांकरिता याच परिसरात चार ते पाच उद्याने, जगाच्या बरोबरीने विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी वातानुकूलित संगणक प्रशिक्षण केंद्र, वाचनाची आवड असणाऱ्या व ती आवड जोपासण्यासाठी परिसरात ग्रंथालय, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला भवन, सहकार चळवळ जोपासण्यासाठी सहकार भवन, ज्येष्ठ नागरिक आधार केंद्र अशा प्रकारच्या विविध उपक्रमांतर्गत विकासकामे करण्यात आली. लादीकरण, गटारे, पाणी जोडणी इत्यादी मूलभूत सुविधा महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या. गेल्या ४० वर्षांपासून पाणी न पोहोचलेल्या केतकीपाडासारख्या डोंगराळ आदिवासी भागात पाणी पोहोचवण्यातही यश आले. आपल्या मतदारसंघात कोणती कामे प्रस्तावित आहेत? - नॅशनल पार्क श्रीकृष्णनदीशेजारी पाण्यात बंधारा बांधून बोटिंगची सुविधा उपलब्ध करून पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे.अशोकवन येथे प्रसूतिगृहाचे काम हाती घेतले असून, येत्या सहा महिन्यांत ते जनतेसाठी खुले करणे. १० ते १२ कोटींचे बजेट असलेला मुरबाली येथे जलतरण केंद्र. दामू नगर येथे १० कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे काम मंजूर करण्यात आलेय. आकुर्ली रोड हनुमाननगर येथील सलीम कम्पाउंड येथे भव्य क्रीडा भवन, संभाजीनगर येथे आरोग्य केंद्र, सिद्धार्थनगर येथे उद्यान; तसेच गुलमोहर सोसायटी, काजूपाडा, ओवरीपाडा, सावरपाडा येथे तरुणांकरिता व्यायामशाळा आदी विकासकामे हाती घेण्यात आली असून, ती पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत.मतदारसंघातील पुढील विकासकामांचे तुमचे व्हिजन काय?- पाच वर्षांत मतदारसंघात डायलेसीस सेंटर, तरुणांना स्पर्धा परीक्षेत पुढे जाण्यासाठी यूपीएससी, एमपीएससी मार्गदर्शन केंद्र, मागाठाणे परिसरात शेअरिंग रिक्षा, वाढत्या चोऱ्या - दरोड्यांना आळा घालण्यासाठी बीट चौकी, मतदारसंघातील मुख्य प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही यंत्रणा, दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी व फेरीवाल्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी नियोजन करणार आहे. देवीपाडा येथे स्कायवॉक, कांदिवलीप्रमाणे दहिसर चेकनाका येथे वातानुकूलित स्वच्छतागृह, नॅशनल पार्क ओम्कारेश्वर येथे भुयारी मार्ग या सोयीसुविधांची विकासकामे हाती घेणार आहे. बेरोजगार तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनविणे, निराधार- विधवा महिलांकरिता विशेष उन्नती योजना, आदिवासी, वृत्तपत्रे, दूध विक्रेते, वॉचमन आदी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्यांसाठी विशेष उन्नती योजना हे दोन संकल्प आगामी काळात राबविणार आहे. या प्रकल्पांकरिता शासन व संस्थांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून फंड उपलब्ध करून घेणार आहे. .
मागाठाणे खड्डेमुक्त करणार
By admin | Published: October 10, 2014 2:40 AM