भोपाळ: कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार पडल्यानंतर मध्य प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती होण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला धक्का बसला आहे. राज्य सरकारनं विधानसभेत सादर केलेल्या एका विधेयकाच्या बाजूनं भाजपाच्या दोन आमदारांनी मतदान केलं. विशेष म्हणजे मतदानावेळी भाजपाचे इतर सर्व आमदार अनुपस्थित होते. यानंतर भाजपानं दोन आमदारांवर टीका केली. आता या आमदारांना काँग्रेसनं अज्ञातस्थळी हलवलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कमलनाथ त्यांची भेट घेणार आहेत. विधानसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या भाजपा आमदारांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मेहर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण त्रिपाठी आणि ब्योहारीचे आमदार शरद कौल यांनी काँग्रेस सरकारच्या बाजूनं मतदान केल्यानं त्यांच्यावर स्वपक्षानं टीका केली. यानंतर त्रिपाठींनी भाजपाला लक्ष्य केलं. भाजपा कायम खोटी आश्वासनं देते. मला मेहरचा विकास करायचा असून मी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
आज नेमकं काय घडलं?विधानसभेत गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयकावरील मतदानावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेस सरकारला साथ दिली. यावरुन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसकडून अल्पमतातलं सरकार चालवलं जातं. त्यांचं सरकार कधीही कोसळेल, असा दावा कायम भाजपाकडून केला जातो. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायद्यावरील सुधारणा विधेयकावरील मतदानादरम्यान भाजपाच्याच दोन आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं, असा टोला कमलनाथ यांनी लगावला. या विधेयकावरील मतदानादरम्यान कमलनाथ यांनी मतविभाजनाची मागणी केली होती. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली. काल काय म्हणाले होते भाजपा नेते?भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील काँग्रेस सरकार कोसळू शकतं, असे संकेत काल दिले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सपा-बसपामधील अंतर्गत लाथाळ्यांचा उल्लेख केला होता. 'आम्ही इथे (मध्य प्रदेशात) सरकार पाडणार नाही. काँग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,' असं म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे 'ऑपरेशन लोटस'चे संकेत दिले होते.