भोपाळ- मध्य प्रदेशातील सागत जिल्ह्यात असणाऱ्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात विद्यार्थीनींचे कपडे उतरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर हरि सिंह गौर विद्यापीठात तपासणीच्या नावावर जवळपास 40 विद्यार्थीनींचे कपडे उतरविण्यात आले.
हॉस्टेल परिसरात वापरलेलं सॅनिटरी पॅड सापडलं. त्यामुळे हॉस्टेलच्या वॉर्डनने मुलींचे कपडे उतरवून त्यांची तपासणी केली. 24 मार्च रोजी घडलेली ही घटना आहे. विद्यापीठाच्या राणी लक्ष्मीबाई गर्ल्स हॉस्टेलमधील स्वच्छतागृहाबाहेर वापरलेलं सॅनिटरी पॅड सापडलं. त्यामुळे वैतागलेल्या वॉर्डनने आधी मुलींच्या खोल्यांची तपासणी केली आणि त्यानंतर मुलींचे कपडे उतरविले.
वॉर्डनच्या या कृत्यामुळे विद्यार्थीनींनी विद्यापीठाचे कुलगुरू आरपी तिवारी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. विद्यार्थीनींनी या वॉर्डनवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुलगुरूंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत.