खासदार अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, बैलगाडा शर्यतींचा प्रश्न संसदेत मांडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 08:06 PM2019-06-24T20:06:10+5:302019-06-24T20:29:06+5:30
सन्माननीय राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात पशुधन, पशुधनाचे आरोग्य आणि पशुधनाच्या विकासाबाबत माहिती देण्यात आली.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मतदारसंघातील लोकांना दिलेल्या आश्वासनानुसार पहिल्यात भाषणात बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. बैलगाडा शर्यतींसाठी ज्या बैलांचा वापर केला जातो, ते खिलार जातीचे देशी वंशाची बैलं आहेत. खिलारी जातीच्या देशी गायींमध्ये दुधाचे प्रमाण कमी असते. तरीही, महाराष्ट्रातील शेतकरी या गायींचे पालन पोषण करतो. कारण, या गायींकडून खिलारी जातीच्या बैलांना जन्म दिला जातो. मात्र, सरकारने लादलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, सरकारने ही बंदी उठवावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचेही कोल्हेंनी संसदेत बोलताना म्हटले.
सन्माननीय राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात पशुधन, पशुधनाचे आरोग्य आणि पशुधनाच्या विकासाबाबत माहिती देण्यात आली. देशात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. पण, बैलगाडा शर्यत ही केवळ मनोरंजन नसून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं मोठं माध्यम आहे. आईसकांडी विकणाऱ्यापासून ते भेळ विकणाऱ्यांपर्यंत सर्वचजण यामध्ये सहभागी होता. केवळ बैलगाडा मालकच नाहीत, तर ट्रान्सपोर्टपासून ते सर्वसामन्यही मोठ्या प्रमाणात या बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी होता. त्यामुळे, हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी आणणारा खेळाचा प्रकार असल्याचं अमोल कोल्हे यांनी संसदेतील आपल्या प्रश्नोत्तरावेळी सांगितले.
केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शर्यत पूर्ववत होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी जिल्हा, राज्य आणि अगदी देश पातळीवर संघटना स्थापन केली. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर या प्रश्नाला गती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडले होते. संसदेत विधेयक मांडणीची प्रक्रिया किचकट असल्यामुळे प्रक्रियेला कायदेशीर रूप देण्यासाठी केंद्र सरकारने वेग दिला आणि विधेयक मंजूर करण्यात आले. परंतु, काही नियम घालून देण्यात आले आहेत. या शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आज खासदार अमोल कोल्हेंनी संसंदेत बैलगाडी शर्यतींवर असलेली बंदी उठविण्याची मागणी केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकांवेळी लोकांना दिलेल्या आश्वासनांतील पहिला मुद्दा आज कोल्हे यांनी संसदेत मांडला.